ठाणे : आठ वर्षांपासून रखडलेले नळ संयोजनावरील मीटर बसविण्याचे प्रकरण आता पुन्हा नव्याने पटलावर आले आहे. यानुसार, पूर्वीची हायटेक योजना ही अतिखर्चीक असल्याने ती कागदावरच ठेवून पालिकेने आता कमी खर्चाची नवी योजना पुढे आणली आहे. याअंतर्गत नळ संयोजनावर सेमी आॅटोमेटीक मीटर बसविले जाणार आहेत. यासाठी १२ कोटी ५० लाखांचा निधी खर्च केला जाणार आहे. पाणीगळती आणि पाणीचोरी रोखण्यासाठी तसेच पाण्याच्या बिलांची योग्य प्रकारे वसूली व्हावी, या उद्देशाने ठाणे महापालिकेने मीटर बसविण्याचा प्रस्ताव गेल्या काही वर्षांपूर्वी पुढे आणला होता. त्यानुसार, प्रथम हायटेक स्वरूपाचे परदेशी तंत्रज्ञानाचे मीटर बसविण्याचे पालिकेने निश्चित केले होते. यामध्ये खाजगी ठेकेदाराला हे काम देण्यात येणार होते. त्यांचे कर्मचारी परिसरात जाऊन त्या परिसरात बसविण्यात आलेल्या मीटरचे एकाच वेळी रीडिंग घेणार, अशा प्रकारची ही योजना होती. यासाठी ३५ कोटींचा निधी खर्च केला जाणार होता. पहिल्या टप्प्यात तीन कोटी ५० लाख रुपयांची तरतूद केली होती. पहिल्या वर्षात वाणिज्य वापरासाठी असलेला पाणीपुरवठा संपूर्णपणे मीटर (जलमापक) द्वारे करण्यात येणार होता. त्यासाठी एमआरए पद्धतीचे मीटर बसविण्यात येणार होते़ दुसऱ्या टप्प्यात रहिवासी गृहसंकुले आणि इतर इमारतींतील नळजोडण्यांवर मीटर बसविले जाणार होते. पाण्याच्या वापरानुसार पैसे भरावे लागणार असल्याने नागरिक पाण्याचा अपव्यय टाळतील, असे पालिकेचे म्हणणे होते. या योजनेसाठी एकूण ३५ कोटींचा खर्च अपेक्षित धरला होता. या मीटरची एक वर्षाच्या कालावधीकरिता विनाशुल्क देखभाल दुरुस्ती करणे व नंतर पाच वर्षांच्या कालावधीसाठी सशुल्क देखभाल करणे. तसेच एकूण सहा वर्षांच्या कालावधीसाठी मीटर रीडिंग घेऊन व ठामपामार्फत तयार करण्यात आलेली बिले वितरण करण्याच्या कामाचा प्रामुख्याने यात समावेश करण्यात आला होता.
पाण्यासाठी सेमी - आॅटोमॅटिक मीटर
By admin | Published: November 06, 2014 11:21 PM