Join us

जलयुक्त शिवार :कॉपी नाही - मुख्यमंत्री

By admin | Published: March 17, 2015 1:26 AM

राज्य सरकारने जलयुक्त शिवार ही महत्त्वाकांक्षी अशी एकात्मिक योजना हाती घेताना आधीच्या जलयुक्त गाव योजनेची कोणतीही कॉपी केलेली नाही.

मुंबई : राज्य सरकारने जलयुक्त शिवार ही महत्त्वाकांक्षी अशी एकात्मिक योजना हाती घेताना आधीच्या जलयुक्त गाव योजनेची कोणतीही कॉपी केलेली नाही. जलयुक्त शिवार ही योजना मुख्यमंत्र्यांचा फ्लॅगशिप कार्यक्रम असून त्याद्वारे पाच वर्षांत २५ हजार गावे टंचाईमुक्त करण्याचे ध्येय असल्याचे मुख्यमंत्री कार्यालयाने स्पष्ट केले आहे. ‘गावाच्या जागी केले शिवार..शब्दांचा खेळ जुन्या योजनांची केली कॉपी’ या लोकमतने १५ मार्चच्या अंकात प्रसिद्ध केलेल्या बातमीसंदर्भात खुलासा करताना मुख्यमंत्री कार्यालयाने म्हटले आहे की, सकृतदर्शनी दोन योजनांमध्ये साम्य दिसत असले तरी जलयुक्त शिवार अभियानाचा मूळ गाभा हा पाणलोट विकास आहे. प्रथमच पाण्याचा ताळेबंद मांडून गावाची पाण्याची गरज निश्चित करून व उपलब्ध पाणी साठवणुकीची कामे विचारात घेऊन उर्वरित कामे करण्यासाठी गाव शिवार भेट घेऊन लोकांच्या संमतीने व ग्राम सभेच्या मान्यतेने गावांचे आराखडे निश्चित करण्यात आले आहेत. पाण्याचे विकेंद्रित साठे करण्याचे धोरण स्वीकारून दरवर्षी पाच हजार गावे टंचाईमुक्त करण्यात येणार आहेत. या अभियानांतर्गत ७ हजार कामे सुरू झालेली आहेत. विदर्भ, मराठवाड्यास प्राधान्य देण्यात आले आहे. याशिवाय गाळ काढणे, खोलीकरणासाठी ७५ कोटी रुपये देण्यात आले आहेत. जिल्हा नियोजन समितीतून पहिल्यांदाच १० टक्के निधी या अभियानासाठी राखीव ठेवला आहे, असेही मुख्यमंत्री कार्यालयाने स्पष्ट केले आहे. (विशेष प्रतिनिधी)