२०२५पर्यंत पाण्याची तीव्र टंचाई
By admin | Published: May 22, 2015 01:35 AM2015-05-22T01:35:03+5:302015-05-22T01:35:03+5:30
देशातील पाणीपुरवठा आणि पाण्याची मागणी यामध्ये प्रचंड तफावत असल्याने २०२५ सालापर्यंत देशात पाण्याचा तीव्र तुटवडा निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे,
मुंबई : देशातील पाणीपुरवठा आणि पाण्याची मागणी यामध्ये प्रचंड तफावत असल्याने २०२५ सालापर्यंत देशात पाण्याचा तीव्र तुटवडा निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे, असा दावा एव्हरीथिंग अबाउट वॉटर या कंपनीतर्फे सादर करण्यात आलेल्या अहवालात करण्यात आला आहे. मुंबई एक्झिबिशन सेंटरमध्ये आयोजित जलप्रदर्शनात हा अहवाल गुरुवारी सादर करण्यात आला.
या अहवालानुसार देशात औद्योगिक कारणांसाठी ४० अब्ज घन मीटर (बीसीएम) पाण्याचा वापर करण्यात येतो. हे प्रमाण सध्याच्या उपलब्ध पाणीसाठ्याच्या ६ टक्के आहे. या उलट उद्योगांतून दरवर्षी ३०.७ अब्ज घनमीटर सांडपाण्याचा विसर्ग होतो. या अंदाजानुसार २०२५ सालापर्यंत पाण्याची मागणी १९१ अब्ज घनमीटरपर्यंत वाढण्याची शक्यता अहवालात नोंदवण्यात आली आहे. परिणामी प्रदूषण नियंत्रण मंडळाने निर्मिती उद्योगांवर घातलेले निर्बंध अधिक कडक होण्याची आवश्यकता अहवालात नमूद करण्यात आली आहे. महाराष्ट्र जल संसाधन नियामक प्राधिकरणाचे अध्यक्ष रवी. बी. बुधीराजा यांनी या जलप्रदर्शनाचे उद्घाटन केले. या प्रदर्शनात २१ देशांतील ३०० प्रदर्शकांनी भाग घेतला आहे. त्यात पाण्याशी संबंधित अत्याधुनिक तंत्रज्ञान व सांडपाणी व्यवस्थापनातील अतिप्रगत उपाययोजनांचा समावेश आहे. यावेळी जलतज्ज्ञ एच. सुब्रमण्यम म्हणाले, पाणीपुरवठा, वितरण व सांडपाणी व्यवस्थापनासाठी नव्या पायाभूत सुविधा निर्माण करण्याची गरज आहे. त्यासाठी आवश्यक मनुष्यबळामुळे येत्या ३ वर्षांत १० लाख रोजगार निर्माण होण्याची शक्यता आहे. गंगा नदी स्वच्छता प्रकल्प, स्मार्ट सिटी आणि स्वच्छ भारत अभियान देशातील जल उद्योगाला चालना देतील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.