Join us  

शहर भागात गुरुवारी पाणी कपातीचे संकट; मुंबईकरांनो पाणी जरा जपून वापरा

By जयंत होवाळ | Published: December 05, 2023 8:02 PM

Water shortage in Mumbai: ए, सी, डी, जी उत्तर, जी दक्षिण विभागातील नागरिकांमा पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : वेरावली जलवाहिनीच्या दुरुस्तीमुळे पश्चिम उपनगरातील रहिवाशांची  गेली तीन दिवस पाण्यासाठी परवड झाली असताना गुरुवारी शहर भागातील नागरिकांनाही पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे. मलबार हिल जलाशय पुनर्बांधणी संदर्भात तज्ज्ञ समिती ७ डिसेंबर रोजी अंतर्गत पाहणी करणार असल्याने जलाशयाचा कप्पा रिक्त करावा लागणार असल्याने शहर विभागात काही परिसरात पाणीकपात, तर काही ठिकाणी पाणीपुरवठा बंद राहील.

ए, सी, डी, जी उत्तर, जी दक्षिण विभागातील नागरिकांमा पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार आहे. पालिकेने मलबार हिल जलाशयाच्या पुनर्बांधणीचे काम हाती घेतले असून तज्ज्ञ समिती जलाशयामधील कप्पा क्रमांक २ ची अंतर्गत पाहणी करणार आहे. त्यासाठी जलाशयाचा कप्पा क्रमांक २ रिक्त करणे आवश्यक आहे. परिणामी पाणीपुरवठ्यात पाणीकपात करावी लागणार आहे, असे पालिकेच्यावतीने सांगण्यात आले.

पाणीपुरवठ्यावर परिणाम होणारे विभाग - *ए’ विभाग- कफ परेड व आंबेडकर नगर – (नियमित पाणीपुरवठ्याची वेळ सकाळी ११.२० ते दुपारी १.४५ वाजेपर्यंत)- याठिकाणी १०० टक्के पाणीपुरवठा बंद नरिमन पॉईट व जी. डी. सोमाणी – (नियमित पाणीपुरवठ्याची वेळ दुपारी १.४५ ते ३ वाजेपर्यंत) -  ५० टक्के पाणी कपात . मिलीट्री झोन- (नियमित पाणीपुरवठ्याची वेळ – २४ तास) – ३० टक्के  कपात. मलबार हिल व आझाद मैदान जलाशयातून पाणी पुरवठा होणाऱ्या  'ए' विभागातील सर्व विभागात (वरील विभाग वगळून) -१० टक्के  कपात.

सी विभाग- मलबार हिल व आझाद मैदान जलाशयातून पाणीपुरवठा होणाऱ्या  'सी' विभागातील सर्व विभागात १० टक्के कपात .

डी विभाग- पेडर रोड- (नियमित पाणीपुरवठ्याची वेळ - दुपारी १ ते रात्री १०.३० वाजेपर्यंत) – २० टक्के कपात . मलबार हिल व आझाद मैदान जलाशयातून पाणीपुरवठा होणाऱ्या 'डी' विभागातील विभागात (वरील विभाग वगळून) १० टक्के कपात. ० जी उत्तर व जी दक्षिण विभाग- जी उत्तर व जी दक्षिण विभागातील थेट पाणीपुरवठा होणारे सर्व विभाग – १० टक्के  कपात .

७ डिसेंबर २०२३ वर नमूद केल्याप्रमाणे पाणीपुरवठा होईल. तसेच काही ठिकाणी पाण्याचा दाब कमी राहील. या पाणीकपाती दरम्यान जलाशयातील पातळी लक्षात घेऊन आवश्यकता भासल्यास विभागवार पाण्याच्या वेळेत बदल करण्यात येईल, असे पालिकेने स्पष्ट केले आहे. 

टॅग्स :पाणीकपातमुंबई