शाळांना पाणीटंचाईचे संकट
By admin | Published: July 2, 2014 11:47 PM2014-07-02T23:47:28+5:302014-07-02T23:47:28+5:30
मान्सून लांबल्याने पाणी टंचाईचे संकट दिवसेंदिवस गडद होत आहे. विद्यार्थ्यांना पाणी पुरवणे शाळा प्रशासनाला जिकरीचे बनले आहे.
बोर्डी : मान्सून लांबल्याने पाणी टंचाईचे संकट दिवसेंदिवस गडद होत आहे. विद्यार्थ्यांना पाणी पुरवणे शाळा प्रशासनाला जिकरीचे बनले आहे. दरम्यान, शाळेच्या वेळापत्रकात बदल करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी तत्परतेने द्यावेत तरच विद्यार्थी, शिक्षक व पालकांचे जीवन सुसह्य होण्यास मदत होईल, अशी विचारधारा निर्माण झाली आहे.
मान्सून लांबल्याने पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पिण्याचा पाणी प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. जलास्त्रोतांनी तळ गाठल्याने पाणी गाळमिश्रीत आहे. विद्यार्थ्यांना पिण्याचे व शौचालयास पाणी पुरवताना शाळा व्यवस्थापनाला नाकी नऊ येत आहेत. भारनियमनामुळे विजेअभावी पंखे बंद असल्याने उकडल्याने विद्यार्थी -शिक्षकांना अध्ययन -अध्यापनास असुविधेचा सामना करावा लागतो.
पाणी टंचाईवर मात करण्याकरिता शासनपातळीवर उपाययोजना आखल्या जात आहेत. त्यानुसार शाळा वेळापत्रकात तत्काळ बदल करुन प्राथमिक व माध्यमिक शाळांचे सकाळचे सत्र सुरु करणे आवश्यक आहे. निम्म्या तासिकेनंतर सुट्टी, सोमवार ते गुरुवार चार दिवसांचा आठवडा आदी उपाययोजना जिल्हाधिकाऱ्यांनी तत्काळ आणण्याची मागणी होत आहे. जलस्त्रोतांना मुबलक पाणीसाठा होईपर्यंत अंमलबजावणी अपेक्षित आहे. पाणीप्रश्नी विद्यार्थ्यांचा बळी गेल्यास विद्यार्थी, पालक व नागरिक रस्त्यावर उतरुन आंदोलनाचा पवित्रा घेतील.(वार्ताहर)