मुंबईकरांवर पाणीटंचाईचे सावट? मागील २ वर्षांपेक्षा पाणीसाठ्यात ५ ते ७ टक्क्यांनी घट
By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2024 09:38 AM2024-01-30T09:38:45+5:302024-01-30T09:40:07+5:30
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही तलावांत सध्या ५५ टक्केच जलसाठा उरला आहे.
मुंबई : नवीन वर्षात मुंबईकरांची जलचिंता वाढणार आहे. कारण, मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही तलावांत सध्या ५५ टक्केच जलसाठा उरला आहे. गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत हा साठा कमी झाला असून, मुंबईकरांवर पाणीटंचाईचे सावट आहे. सात तलावांपैकी मध्य वैतरणा आणि मोडक सागर तलावांतील जलसाठा ५० टक्क्यांपेक्षाही खाली गेला आहे. अन्य तलावांतील जलसाठाही झपाट्याने कमी होऊ लागल्याने मुंबईकरांवरील पाणीटंचाईचे सावट गडद होण्याची चिन्हे आहेत.
मुंबईला अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुळशी या सातही तलावांची पाणी साठवण क्षमता १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर आहे. मात्र, नवीन वर्षाच्या सुरुवातीला सातही तलावांतील पाणीसाठा आणखी कमी झाला आहे. ८ जानेवारी २०२४ रोजी सातही तलावांतील पाणीसाठा ५५.२१ टक्के, म्हणजेच ७ लाख ९९ हजार १४७ दशलक्ष लिटर इतका आहे. २०२३ मध्ये याच काळात ६०.४९ टक्के, म्हणजेच, ८ लाख ७५ हजार ८५६ दशलक्ष लिटर पाणीसाठा शिल्लक होता, तर २०२२ मध्ये या काळातील पाणीसाठा ६२.९७ टक्के म्हणजेच, ९ लाख ११ हजार ४३६ दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा उपलब्ध होता.
डिसेंबर २०२३ च्या अखेरीस एकूण ८० टक्के जलसाठा होता. गेल्या वर्षी ऑक्टोबरपर्यंत सातत्याने तलावक्षेत्रात पाऊस पडला होता. त्यामुळे जलसाठा समाधानकारक होता. पण, यंदा अपुरा पाऊस आणि इतर कारणांमुळे जलसाठा कमी झाल्याचे सूत्रांनी सांगितले. बेफिकिरीने होणारा पाण्याचा वापर, बाष्पीभवन, जलाशयांना लागलेली गळती ही यामागची कारणे आहेत. जलवाहिन्यांनाही गळती लागल्याचे प्रमाण वाढू लागल्याने मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात आहे. एकंदरीतच मुंबईकरांना पाणी जपून वापरावे लागणार आहे.
गळतीसत्र सुरूच :
मुंबईला सात तलावांतून मोठ्या जलवाहिन्यांमार्फत पाणीपुरवठा होतो. अनेक ठिकाणी छोटी-मोठी पाणीगळती होत आहे. २०२२ पासून ते आतापर्यंत पाणीगळतीच्या एकूण ५५ हजार तक्रारी पालिकेला मिळाल्या आहेत. या गळतीमुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात आहे.
जलसाठा निम्म्याहून कमी :
मोडक सागर तलावामधील जलसाठा ४४.९७ टक्के झाला आहे. गेल्या वर्षी हाच साठा ५९ टक्के होता. या तलावाची पाणीसाठवण क्षमता एकूण १ लाख २८ हजार ९२५ दशलक्ष लिटर असून, सध्या ५७ हजार ९७७ दशलक्ष लिटर जलसाठाच आहे.
मध्य वैतरणाचा जलसाठा १ लाख ९३ हजार ५३० दशलक्ष लिटर आहे. सध्या ३६ टक्के म्हणजेच ६९ हजार ७४२ दशलक्ष लिटर जलसाठा आहे.