पाणीटंचाईचा प्रश्न निकाली!
By admin | Published: February 27, 2015 10:31 PM2015-02-27T22:31:40+5:302015-02-27T22:31:40+5:30
मुरुड, महाड, पेण परिसरात फेब्रुवारीच्या अखेरीसच पाणीटंचाई भेडसावत आहे. याठिकाणी अनेक पाणीयोजना राबविण्यात आल्या असल्या तरी त्या निष्फळ ठरत आहेत.
नांदगाव : मुरुड, महाड, पेण परिसरात फेब्रुवारीच्या अखेरीसच पाणीटंचाई भेडसावत आहे. याठिकाणी अनेक पाणीयोजना राबविण्यात आल्या असल्या तरी त्या निष्फळ ठरत आहेत. दूरवरून पाणी आणताना मुरुड तालुक्यातील सावली येथील एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली आहे. त्यामुळे आतातरी प्रशासनाला जाग येईल का, असा प्रश्न ग्रामस्थांकडून विचारण्यात येत आहे.
मुरुड तालुक्यातील ग्रामपंचायत हद्दीमध्ये सध्या पाण्याची तीव्र टंचाई आहे. याठिकाणी तीन योजना राबविण्यात आल्या आहेत. त्यासाठी लाखो रुपये खर्च करण्यात आले असले तरी पाणीटंचाई मात्र जैसे थे आहे. पाण्यासाठी वणवण करताना एका ज्येष्ठ व्यक्तीचा मृत्यू झाल्याने सर्वत्र खळबळ माजली होती. या प्रकरणाची गंभीर दखल घेत तहसीलदार गोसावी व गटविकास अधिकारी संदीप जठार यांनी सावली ग्रामपंचायतीस भेट देऊन सर्व परिस्थितीचा आढावा घेतला.
सावली ग्रामपंचायतीस पाणी कसे लवकरात लवकर मिळेल, यासाठी विशेष आराखडा तयार करून त्यावर उपाययोजना करण्याचा निर्णय घेण्यात आला.
सावली ग्रामपंचायतमध्ये १९९२ रोजी एमजीपीकडून अराटी ते सावली पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली. ही योजना अत्यंत प्रभावी होती. स्वतंत्र पाण्याची टाकी व पाणीपुरवठा करण्यासाठी मोठी मशिनरीज्सुद्धा उपलब्ध होती. परंतु पाइपलाइन फुटल्याने सदरची योजना प्रभावहीन झाली. २००९ ला भारत निर्माण योजनेंतर्गत ७४ लाखांची योजना करण्यात आली. परंतु ही योजना पूर्णच होऊ शकली नाही. यातील २४ लाख रुपये देणे बाकी असून योजना पूर्ण होऊ न शकल्याने ग्रामपंचायतीस हस्तांतरित करता आली नाही. ५० लाख ठेकेदाराने घेऊन काम अपूर्णच राहिले. २०११-१२ रोजी राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेंतर्गत ४८ लाखांची योजना आणण्यात आली. परंतु तीसुद्धा पूर्ण करता आली नाही. याठिकाणी ८ लाख ४२ हजार ८७५ चा बंधारा बांधावयाचा होता. परंतु प्रत्यक्षात हे काम ५० हजार रुपयांचे सुद्धा नाही, अशी तक्रार विजय ठाकूर यांनी केली असून संबंधित अभियंत्यावर कारवाई करण्याची मागणी सावली ग्रामस्थांनी केली आहे.
सध्या सावलीतील ग्रामस्थांना दीड किलोमीटरवर असणाऱ्या विहिरीवरून पाणी आणावे लागत आहे. याठिकाणी सामुदायिक श्रमदानातून एमजीपी योजनेतून २० लिकेजेस दुरुस्त केले आहेत. सरपंच मंदा ठाकूर यांनी पिण्याचे पाणी मिळावे, अशी मागणी गटविकास अधिकाऱ्यांकडे केली आहे.
(वार्ताहर)