मुंबई : पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी मुंबईतील चौपाट्यांचा विकास करण्याचा निर्णय एमटीडीसीने (महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ) घेतला आहे. यात प्रथम जुहू (अंधेरी दिशेने असलेला भाग) चौपाटीचा विकास केला जाणार आहे. त्यासाठी आवश्यक असलेली मंजुरी पर्यावरण विभागाकडून देण्यात आल्याची माहिती एमटीडीसीकडून देण्यात आली. जुहू चौपाटीचा विकास करताना प्रथम वॉटर स्पोटर््स सुविधा उपलब्ध केली जाणार आहे. मुंबईत मोठ्या संख्येने पर्यटक येतात. मात्र मुंबईतील चौपाट्यांवर आल्यानंतर त्यांची निराशाच होते आणि पर्यटक हे चौपाट्यांकडे पाठच फिरवितात. हे टाळण्यासाठी आणि मुंबईतील चौपाट्यांवरील वेगळा अनुभव पर्यटकांना देण्यासाठी वर्सोवा, जुहू (अंधेरीच्या दिशेने असलेला भाग) आणि गिरगाव चौपाटीचा विकास एमटीडीसीने करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या चौपाट्यांवर मरीना (बोट पार्किंग), पर्यटकांसाठी शॉवर आणि टॉयलेट, पक्षी संग्रहालय, अॅम्पी थिएटर (प्रेक्षागृह किंवा नाट्यगृह), कॅफेटेरिया, वाहनांसाठी पार्किंग उभारण्याचे नियोजन केले आहे. तसेच साहसी खेळही चौपाट्यांवर उपलब्ध केले जाणार आहेत. तीनही चौपाट्यांचा सार्वजनिक-खासगी भागीदारीत (पीपीपी) विकास केला जाणार असून प्रथम जुहू चौपाटीचा विकास करण्याचा निर्णय एमटीडीसीने घेतला आहे. मात्र यासाठी पर्यावरण विभागाची मंजुरी आवश्यक असल्याने तसा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. त्याला नुकतीच मंजुरी देण्यात आल्याची माहिती एमटीडीसीचे साहसी क्रीडा व्यवस्थापक सुबोध किनळेकर यांनी दिली. जुहू चौपाटीचा विकास करताना प्रथम वॉटर स्पोटर््स उपलब्ध करण्याच्या सूचना पर्यावरण विभागाकडून करण्यात आल्या आहेत. तर कॅफेटेरियाही बांधले जाईल. त्यानंतर अन्य सुविधा उपलब्ध करण्यावर विचार केला जाईल. या कामासाठी सल्लागार कंपनी म्हणून पी. के. दास असोशिएट्सची नेमणूक करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
जुहू चौपाटीवर अनुभवता येणार वॉटर स्पोटस
By admin | Published: April 19, 2016 3:55 AM