- जयंत होवाळलोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : तब्ब्ल चार महिन्यांचा वेळ घेतल्यानंतर ऑक्टोबर महिन्यात मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणातील पाणी साठ्याने अखेर मागील वर्षाच्या पाणी साठ्याची पातळी ओलांडली आहे. मात्र २०२१ साली झालेल्या पाणीसाठ्याची सरासरी काही गाठता आलेली नाही. तरीही यंदाच्या एकूण सरासरीमुळे पुढील जून महिन्यापर्यंतची मुंबईकरांची चिंता मिटली आहे.
यावर्षी जून आणि जुलै महिन्यात दमदार पाऊस झाल्यानंतर ऑगस्ट महिन्याच्या मध्यानंतर पाऊस परागंदा झाला. सप्टेंबर महिना उजाडला तरी पाऊस रुसून बसला होता. त्यामुळे मुंबईवर पाणी कपातीची टांगती तलवार होती.पावसाचा रागरंग पाहून पाणी कपातीचा निर्णय घेण्याच्या मनस्थितीत पालिका प्रशासन आले होते. परंतु पाऊस पुन्हा दमदारपणे बरसू लागल्याने मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रातील पाणी साठ्यात हळू हळू वाढ होऊ लागली. सप्टेंबरच्या पहिल्या पंधरवड्यानंतर पावसाचा जोर ओसरू लागला. मात्र संपूर्ण महिना रिपरिप सुरूच होती. विशेष म्हणजे धरण क्षेत्रात पावसाची पावले रेंगाळल्यामुळे पाणी साठ्यात रोज किंचीत का होईना, वाढ होत होती.
अजूनही अधूनमधून पावसाच्या सरी बरसतच आहेत. पुन्हा एकदा विशेष करून कोकण विभागात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्याचबरोबर मुंबईत पावसाने माघार घेण्यास सुरुवात केल्याचे हवामान विभागाने जाहीर केली आहे. येत्या काही दिवसात पाऊस मुंबईतला मुक्काम हलवेल. यंदा पावसाने संपूर्ण चार महिने तळ ठोकला होता. पावसाच्या या प्रदीर्घ मुक्कामामुळे धरण क्षेत्राला मोठा दिलासा मिळाला.धरणक्षेत्रातील पावसाची नोंदसन २०२३ - १४ लाख ३५ हजार ४५८ दशलक्ष लिटरसन २०२२ - १४ लाख २६ हजार ६६५मोडक सागर, तुळशी, विहार आणि तानसा हे तलाव पूर्ण भरले आहेत.