नवी मुंबई : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मोरबे धरणात अद्यापि मुबलक पाणीसाठा आहे. साधारण डिसेंबरपर्यंत पुरेल इतके पाणी धरणात शिल्लक असल्याने यावर्षी नवी मुंबईकरांना कोणत्याही पाणीकपातीला समोरे जावे लागणार नाही. गेल्या वर्षभरात महापालिकेने पाण्याचे सुयोग्य नियोजन केले. त्यामुळे पाण्याच्या स्वैर वापराला आळा बसल्याने सध्या धरणात मुबलक पाणी शिल्लक राहिले आहे. स्वत:च्या मालकीचे धरण असलेली नवी मुंबई ही राज्यातील दुसरी महापालिका आहे. खालापूर तालुक्यातील स्वमालकीच्या मोरबे धरणातून महापालिकेला शहरवासीयांना चोवीस तास पाणी पुरवठा करते. परंतु गेल्या वर्षी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पुरेसा पाऊस पडला नाही. त्यामुळे नवी मुंबईकरांना पाणीकपातीला सामोरे जावे लागले. विशेष म्हणजे भविष्यात अशा प्रकारच्या पाणीकपातीचे संकट ओढावू नये, यादृष्टीने महापालिकेचे माजी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी गेल्या वर्षभरात पाणी नियोजनाच्या अनेक स्तुत्य योजना राबविल्या. पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी नागरिकांना आवाहन केले. पाण्याची गळती थांबविण्यासाठी ठोस उपायोजना आखल्या. अनधिकृत नळजोडण्यात खंडित करण्याची कारवाई करण्यात आली. पन्नास रूपयांत ३0 हजार लीटर पाणी देण्याच्या सत्ताधाऱ्यांच्या धोरणामुळे पाण्याचा अधिक वापर होत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले. या धोरणाला धक्का न लावता त्यापेक्षा अधिक पाण्याचा वापर करणाऱ्यांकडून अधिक शुल्क आकारण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी जुने जलमापक बदलून अचूक रिडिंग घेणारे इलेक्ट्रॉनिक जलमापक बसविण्याचा धाडसी निर्णय घेतला. या सर्वांचा परिणाम म्हणून पाण्याच्या अनिर्बंध वापराला आळा बसून पाण्याची मोठ्याप्रमाणात बचत झाली. मोरबे धरणाची पाणी साठवण क्षमता ८८ मीटर इतकी आहे. सध्या धरणातील पाण्याची पातळी ७७.२३ मीटर इतकी आहे. यावरून धरणात अद्याप जवळपास ८५ टक्के इतका पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे साधारण आणखी आठ महिने म्हणजेच डिसेंबरपर्यंत नवी मुंबईकरांना पाण्याची चिंता करावी लागणार नाही. मान्सूनला आणखी दीड ते दोन महिने उरले आहेत. या वर्षी पाऊस चांगला पडेल, असा हवामान खात्याचा सर्वसाधारण अंदाज आहे. एकूणच यावर्षी नवी मुंबईकरांवर कोणत्याही प्रकारे पाणीकपात लादली जाणार नाही, हे स्पष्ट आहे. असे असले तरी पाण्याचे महत्त्व ओळखून नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.सिडको नोड्सनाही पाणीपुरवठामोरबे धरणासह एमआयडीसी आणि सिडकोकडून महापालिकेच्या जलकुंभात दिवसाला ३२७ एमएलडी इतका पाणीसाठा होतो. यापैकी खारघर, कळंबोली व कामोठे या सिडको नोड्सना महापालिका पाणीपुरवठा करते. तर जलकुंभातील एकूण जलसाठ्यापैकी जवळपास २७0 एमएलडी इतके पाणी नवी मुंबईतील विविध उपनगरांना पुरविले जाते. दिवसाला ३२७ एमएलडी पाणीमहापालिका मोरबे धरणासह उपलब्ध विविध स्रोतांच्या माध्यमातून दिवसाला एकूण ३२७ एमएलडी इतका पाणीपुरवठा करते. यात स्वत:च्या मोरबे धरणातून दिवसाला २१0 एमएलडी इतके पाणी घेतले जाते. तर एमआयडीसीकडून मिळणाऱ्या ६0 एमएलडी पाण्याचा गावठाण आणि झोपडपट्ट्यांना पुरवठा केला जातो. सिडकोच्या हेटवणे धरणातून ३0 एमएलडी इतके पाणी घेतले जाते.
मोरबेत डिसेंबरपर्यंत पुरेल एवढा जलसाठा
By admin | Published: April 11, 2017 1:52 AM