दादर, माटुंगा, प्रभादेवीत उद्या पाणीपुरवठा बंद; २६ तास सुरु राहणार दुरुस्तीचे काम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2023 08:55 AM2023-05-26T08:55:13+5:302023-05-26T08:55:21+5:30
दादर (पश्चिम) मधील सेनापती बापट मार्ग व काकासाहेब गाडगीळ मार्ग येथील जंक्शनवर १,४५० मिमी व्यासाची तानसा जलवाहिनी आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : दादर पश्चिम परिसरात १,४५० मिमी व्यासाच्या तानसा जलवाहिनीला लागलेल्या गळतीच्या दुरुस्तीचे काम पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून शनिवारी हाती घेण्यात येणार आहे. हे काम २७ मे रोजी सकाळी ८ ते रविवार २८ मे रोजी सकाळी १० असे २६ तास चालणार आहे. या कामादरम्यान पाणीपुरवठा बंद करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे दादर, माहीम, माटुंगा, लोअर परळ, प्रभादेवी या भागात पाणी येणार नाही.
दादर (पश्चिम) मधील सेनापती बापट मार्ग व काकासाहेब गाडगीळ मार्ग येथील जंक्शनवर १,४५० मिमी व्यासाची तानसा जलवाहिनी आहे. या जलवाहिनीला गळती लागली असून, जलवाहिनीवरील गळती दुरुस्तीचे काम जलअभियंता विभागाकडून हाती घेण्यात येणार आहे. या ठिकाणी पाणी कपात घेऊन त्यानंतर नेमकी गळती शोधून पॅच वर्क अथवा रिबेट बदलून दुरुस्ती केली जाणार आहे.
या विभागात पाणी येणार नाही
जी उत्तर विभाग : संपूर्ण माहीम पश्चिम, माटुंगा पश्चिम, दादर पश्चिम विभागात, सेनापती बापट मार्ग, वीर सावरकर मार्ग, गोखले रोड, काकासाहेब गाडगीळ मार्ग, एल. जे. मार्ग, सयानी मार्ग, भवानी शंकर मार्ग, मोरी मार्ग, सेनाभवन परिसर, टी. एच. कटारिया मार्ग, कापड बाजार या परिसरात २७ मे रोजी सायंकाळी ४ ते रात्री १० या कालावधीत पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
जी दक्षिण विभाग : डिलाईड रोड बीडीडी, संपूर्ण प्रभादेवी परिसर, जनता वसाहत, संपूर्ण लोअर परळ विभाग, पांडुरंग बुधकर मार्ग, सेनापती बापट मार्ग, गणपतराव कदम मार्ग, ना. म. जोशी मार्ग, वीर सावरकर मार्ग, एस. एस. अमृतवार या परिसरात २७ मे रोजी दुपारी २:३० ते सायंकाळी ७ या कालावधीत पाणीपुरवठा होणार नाही.