Join us

देहरंग धरणातून पनवेलला पाणीपुरवठा सुरू

By admin | Published: July 01, 2015 10:46 PM

गेल्या महिन्याच्या शेवटी देहरंग धरणाने सांडवा पातळी गाठली होती. त्यामधील गाळ निवळल्यानंतर सोमवारपासून या जलाशयातून पनवेल शहराला पाणीपुरवठा करण्यास सुरु वात झाली आहे.

पनवेल : गेल्या महिन्याच्या शेवटी देहरंग धरणाने सांडवा पातळी गाठली होती. त्यामधील गाळ निवळल्यानंतर सोमवारपासून या जलाशयातून पनवेल शहराला पाणीपुरवठा करण्यास सुरु वात झाली आहे. गेल्या तीन दिवसांपासून रोज ११ एमएलडी पाणी घेण्यात येत असून पालिकेची प्रतिमहा २७ लाख रुपये बचत होणार असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आली. पनवेल शहराला उन्हाळा वगळता इतर वेळी प्रतिदिन ११ ते १२ एमएलडी पाणीपुरवठा केला जातो. शहराला पाण्याची दुप्पट मागणी आहे. त्याकरिता एमजेपी आणि एमआयडीसीकडून पाणी विकत घेतले जाते. मार्च, एप्रिलमध्ये धरण कोरडे पडल्यानंतर पालिकेला पूर्णत: या दोन्ही विभागांवर पाण्याकरिता अवलंबून राहावे लागते. त्याकरिता वाढीव कोटा घ्यावा लागत असून त्यासाठी कोट्यवधी रु पये प्रशासनाला मोजावे लागतात. यंदाही उन्हाळ्यात देहरंगच्या घशाला कोरड पडली होती. मात्र गेल्या महिन्याच्या शेवटी देहरंग परिसरात समाधानकारक पाऊस पडला आणि धरण ओव्हरफ्लो झाले. त्यामुळे गोडबोले गेटही उघडण्यात आले होते. माथेरान आणि हाजी मलंगच्या डोंगरावरून मोठ्या प्रमाणात गाळ वाहून आल्याने पाणी गढूळ झाले होते. आठ दिवसांनंतर त्यामधील गाळ निवळला. त्यामुळे २९ जूनपासून पनवेल शहराला पाणीपुरवठा करण्यात आला असल्याचे पाणीपुरवठा विभागाचे अभियंता आर. आर. तायडे यांनी सांगितले. त्यामुळे आगामी काळात पूर्णत: एमजेपीवर अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही. त्याचबरोबर पनवेलकरांना पाण्याची कमतरता भासणार नाही, असे पालिकेकडून सांगण्यात आले. (वार्ताहर)