नवीन पनवेलला टँकरने पाणीपुरवठा, टँकरचालकांकडून रहिवाशांची अडवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2018 04:34 AM2018-10-05T04:34:19+5:302018-10-05T04:34:50+5:30
एमजेपीकडून पुरवठ्यामध्ये कपात : टँकरचालकांकडून अडवणूक; रहिवाशांच्या तक्रारी
अरुणकुमार मेहत्रे
कळंबोली : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून मागणीप्रमाणे पाणी मिळत नसल्याने नवीन पनवेलमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे आता नवीन पनवेलकरांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. यात टँकरवाल्यांकडूनही अडवणूक केल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्र ते कळंबोली या दरम्यानची जलवाहिनी अतिशय जीर्ण झाली आहे. त्यामुळे एमजेपीकडून वारंवार शटडाउन घेतला जातो.
या व्यतिरिक्त भोकरपाडा येथे अनेकदा वीजपुरवठा खंडित होत असल्याने पाणीपुरवठ्यात अडथळे येत आहेत. नवीन पनवेलमध्ये गेल्या काही दिवसापासून पाणीच येत नाही. रहिवाशांनी सिडकोविरोधात आंदोलन सुद्धा केले आहे. मात्र तरीही पाणीटंचाईचे निवारण झालेले नाही. एमजेपीच्या त्रुटीबरोबरच सिडकोकडून सुद्धा यासंदर्भात कार्यवाही होताना दिसत नाही. पाण्याच्या टाक्या जुन्या झाल्या आहेत. नवीन टाक्या बांधण्याचा प्रस्ताव कागदावरच आहे. जलकुंभ सक्षम नसल्याने आणीबाणीच्या काळासाठी पाणीसाठा करता येत नाही. त्यामुळे पाण्यासाठी शंभर टक्के एमजेपीवर विसंबून राहावे लागते. सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी बुधवारी बोलावलेल्या बैठकीत पाण्याच्या साठवणूक क्षमतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. महापौर डॉ. कविता चौतमोल, नगरसेवक संतोष शेट्टी आणि मनोज भुजबळ यांनी नवीन पनवेलमधील परिस्थिती आणि सिडकोच्या नियोजनशून्य कारभाराचा पाढा वाचला. याबाबत उपाययोजना करण्याच्या सूचना सिडको अध्यक्षांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
काही दिवसांपासून नवीन पनवेलमध्ये बºयाच भागात पाणीपुरवठा होत नाही. त्यासाठी सिडकोने टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केला आहे. मागेल त्याला पाणी देण्याचे सिडको धोरण असले तरी नागरिकांना टँकरवाले वेठीस धरत आहेत. सेक्टर १ मध्ये यावरूनच गुरुवारी टँकरवाल्याने रहिवाशांबरोबर वाद घातला. संतोष शेट्टी यांनी ही बाब सिडकोच्या अधिकाºयांच्या निदर्शनास आणून दिली.
नवीन पनवेलमध्ये पाणी कमी येते ही वस्तुस्थिती आहे. मात्र तरी सुद्धा सर्वांना पाणी मिळेल याचे नियोजन आम्ही करतो. याकरिता टँकरची व्यवस्था केली आहे. शटडाउनच्या काळात जास्त टँकर लागतात. ज्यांना गरज आहे त्यांना टँकरद्वारे पाणी दिले जाते.
- राहुल सरोदे,
सहायक अभियंता, पाणीपुरवठा, सिडको
कळंबोलीत जलवाहिनीला गळती
कळंबोली सर्कलजवळील द्रुतगती महामार्गाच्या पुलाखाली महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची जलवाहिनी गुरु वारी फुटली. त्यामुळे राष्ट्रीय महामार्गावर पाणीच पाणी झाले. नवीन पनवेल, कळंबोली, करंजाडेत तीव्र पाणीटंचाई असताना दुसरीकडे अशा प्रकारे पाणी वाया जात असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात आले आहे. काय पॉइंट ते कळंबोली या नऊ कि.मी. अंतरावरील जलवाहिनी अतिशय जुनाट झालेली आहे. या वाहिनीला ठिकठिकाणी तडे गेले आहेत. आसुडगाव, द्रुतगती महामार्गावरील पुलाखाली आणि स्टील मार्केट परिसरात मोठ्या प्रमाणात पाणीगळती होत आहे.
च्विशेष करून पुलाखाली हे पाणी साचून तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. गुरुवारी याच ठिकाणी वाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले.
च्एकाच ठिकाणी वारंवार पाइपलाइन फुटत असेल तर त्यावर उपाययोजना का होत नाही असा सवाल कळंबोली विकास समितीचे अध्यक्ष प्रशांत रणवरे यांनी केला आहे. गेल्या महिन्यात याच ठिकाणी जलवाहिनीला गळती लागली होती.