मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रात पावसाने दमदार हजेरी लावल्याने मोडकसागर धरणापाठोपाठ तुळशी तलावही मंगळवारी पहाटेपासून भरून वाहू लागला आहे. यामुळे मुंबईकरांना अल्पसा दिलासा मिळाला असला तरी शहरात सध्या लागू असलेल्या २0 टक्के पाणीकपातीबाबत १ आॅक्टोबरलाच निर्णय घेण्यात येणार आहे.यंदा पावसाने पाठ फिरवल्याने राज्यावर पाणीटंचाईचे संकट ओढवले आहे. परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्याने राज्यातील जनतेसह मुंबईकरांनाही दिलासा मिळाला आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणक्षेत्रांमध्येही पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. रविवारी मोडकसागर तलाव भरून वाहू लागल्यानंतर मंगळवारी पहाटे ५.३0पासून मुंबईला पाणीपुरवठा होणारा तुळसी तलावही भरून वाहू लागला आहे. त्यामुळे मुंबईकरांना अल्पसा दिलासा मिळाला आहे. गत वर्षी तुळसी तलाव २८ जुलै रोजीच भरून वाहू लागला होता. परंतु यंदा पावसाने पाठ फिरवल्याने तुळसी तलाव भरण्यासही सप्टेंबरचा चौथा आठवडा उजाडला आहे.तुळशी तलाव भरला असला तरी मुंबईकरांवरील पाणीकपातीचे संकट दूर झालेले नाही. या तलावातून मुंबईला दररोज १८ एमएलडी पाणी पुरविण्यात येते. परंतु मुंबईला दररोज होणाऱ्या पाणीपुरवठ्याच्या तुलनेत ते १ टक्केच आहे. त्यामुळे मुंबईकरांना दिलासा मिळालेला नाही, असे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. सध्या सातही तलावांत मिळून ११ लाख २९ हजार ८९ दशलक्ष लीटर पाणीसाठा उपलब्ध आहे. सध्या मुंबईत २0 टक्के पाणीकपात लागू आहे. पावसाने धरण क्षेत्रात अशीच दमदार हजेरी लावल्यास मुंबईकरांना दिलासा मिळेल, परंतु पाणीकपातीचा निर्णय १ आॅक्टोबर रोजी घेण्यात येईल, असेही या अधिकाऱ्याने सांगितले.
पाणीपुरवठा करणारा तुळशी तलावही भरला
By admin | Published: September 23, 2015 1:51 AM