Join us

मुंबई ते बेलापूर धावणार वॉटर टॅक्सी; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते होणार उद्घाटन

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2022 10:02 AM

स्पीडबोटीचे भाडे प्रतिप्रवासी ८०० ते १२०० रुपये, तर कॅटामरान बोटीकरिता प्रतिप्रवासी २९० रु. भाडे आकारण्यात येणार आहे.

मुंबई : बहुप्रतीक्षित मुंबई ते बेलापूर वॉटर टॅक्सीचा मुहूर्त अखेर निश्चित झाला आहे. महाराष्ट्र मेरिटाइम बोर्ड आणि मुंबई पोर्ट ट्रस्ट यांची महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या वॉटर टॅक्सी सेवेचे उद्घाटन १७ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजता बेलापूर जेट्टी, नवी मुंबई येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. अशी माहिती राज्याचे बंदरेमंत्री अस्लम शेख यांनी दिली.

यावेळी केंद्रीय नौकानयनमंत्री सर्बानंद सोनोवाल, उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाममंत्री (सार्वजनिक उपक्रम) एकनाथ शिंदे, बंदरेमंत्री अस्लम शेख आणि इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत. मंत्री अस्लम शेख म्हणाले की, बेलापूर येथून प्रत्येकी १० ते ३० प्रवासी क्षमता असलेल्या ७ स्पीड बोटी आणि ५६ प्रवासी क्षमता असलेली एक कॅटामरान बोट अशा एकूण ८ बोटींद्वारे वॉटर टॅक्सी सेवा सुरू करण्यात येत आहे. बेलापूर येथून दक्षिण मुंबईत भाऊचा धक्का येथे पोहोचण्यास स्पीड बोटीने फक्त ३० मिनिटे तर कॅटामरान बोटीला ४५ ते ५० मिनिटांचा कालावधी लागणार आहे. स्पीडबोटीचे भाडे प्रतिप्रवासी ८०० ते १२०० रुपये, तर कॅटामरान बोटीकरिता प्रतिप्रवासी २९० रु. भाडे आकारण्यात येणार आहे. बेलापूर येथून भाऊच्या धक्क्याबरोबरच एलिफंटा, जेएनपीटी या जलमार्गावरसुद्धा प्रवासी सेवा चालविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पर्याय किफायतशीरमंत्री अस्लम शेख म्हणाले की, किनारपट्टीवरील बंदरे व खाड्यांमधून दरवर्षी सुमारे २ कोटी प्रवासी प्रवास करतात. जलवाहतुकीचा पर्याय हा किफायतशीर, इंधन व वेळेची बचत करणारा आणि पर्यावरणस्नेही असतो. मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे येथील वाहतूककोंडीची समस्या भेडसावणाऱ्या शहरांसाठी तसेच हळूहळू अलिबागपर्यंत विस्तारत जाणाऱ्या लोकवस्तीसाठी रस्ते व रेल्वे वाहतुकीला पर्याय आहे.

टॅग्स :मुंबईउद्धव ठाकरे