सचिन लुंगसे
मुंबई : मुंबईसह राज्यभरात यंदा पावसाळ्याचे चार महिने मान्सूनने आखडता हात घेतल्याने बहुतांश जिल्ह्यांवर दुष्काळाची टांगती तलवार आहे. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यातील जिल्ह्यांचा यात प्रामुख्याने समावेश असून, रेड म्हणजे डेंजर झोनमध्ये सातारा, सांगली, सोलापूर, धाराशिव, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर, हिंगोली, अकोला आणि अमरावती हे जिल्हे आहेत.
राजस्थानातून परतीच्या प्रवासाला निघालेला मान्सून १० ऑक्टोबरनंतर राज्यातून माघारी फिरणार आहे. तोवर राज्यभरात ठिकठिकाणी सायंकाळी विजांच्या कडकडाटासह ढगांच्या गडगडाटांत पाऊस पडण्याची शक्यता आहे, अशी माहिती मुंबई प्रादेशिक हवामान शास्त्र विभागाचे प्रमुख सुनील कांबळे यांनी दिली.
मुंबईला पाण्याचे नो टेन्शन
मुंबईत आतापर्यंत ९३.८६ टक्के पावसाची नोंद झाली असून, मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही तलावांत पुरेसा पाऊस झाला आहे.
त्यामुळे मुंबईकरांना पिण्याच्या पाण्याचे टेन्शन नसले तरी राज्यातील पिण्याच्या पाण्याचे संकट दिवसागणिक गहिरे होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस (टक्क्यांत)
मुंबई शहर घट ६
रत्नागिरी घट २
कोल्हापूर घट १७
पुणे घट १०
अहमदनगर घट १७
धुळे घट ७
नंदुरबार घट २
बुलढाणा घट ११
वाशिम घट १६
परभणी घट १९
लातूर घट १४
वर्धा घट ५
गोंदिया घट ८