लॉकडाऊन काळात सहव्याधीग्रस्तांना जलवाहतुकीचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:06 AM2021-05-10T04:06:10+5:302021-05-10T04:06:10+5:30

निःशुल्क सेवा; अत्यावश्यक कर्मचाऱ्यांसाठी सुरू असलेल्या फेरीबोटींमधून प्रवास सुहास शेलार लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : लॉकडाऊन काळात नागरिकांच्या मुक्त ...

Water transport support to fellow patients during lockdown | लॉकडाऊन काळात सहव्याधीग्रस्तांना जलवाहतुकीचा आधार

लॉकडाऊन काळात सहव्याधीग्रस्तांना जलवाहतुकीचा आधार

Next

निःशुल्क सेवा; अत्यावश्यक कर्मचाऱ्यांसाठी सुरू असलेल्या फेरीबोटींमधून प्रवास

सुहास शेलार

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : लॉकडाऊन काळात नागरिकांच्या मुक्त संचारासह वाहतुकीवरही निर्बंध आल्याने कोरोनाव्यतिरिक्त अन्य रुग्णांना उपचारांसाठी मुंबई गाठताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. ही अडचण लक्षात घेऊन अत्यावश्यक सेवेसाठी सुरू असलेल्या फेरीबोटींमधून रुग्णांना प्रवासाची मुभा देण्याचा निर्णय जलवाहतूकदारांनी घेतला आहे. विशेष म्हणजे ही सेवा निःशुल्क उपलब्ध करून देण्यात आली आहे.

राज्यात पुन्हा लॉकडाऊन लागू केल्यानंतर जलवाहतूक केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सुरू ठेवण्यात आली. त्यामुळे अलिबागवरून मुंबईत केमोथेरपी किंवा डायलिसीससाठी नियमित ये-जा करणाऱ्यांचे प्रचंड हाल होऊ लागले. अलिबागवरून जलमार्गाने एका तासात मुंबईत पोहोचता येते, तर रस्तेमार्गाने चार तास लागतात. परंतु, कठोर निर्बंधांमुळे वाहतूक मर्यादीत प्रमाणात सुरू असल्याने खासगी वाहतूकदारांनी त्याचा फायदा घेत अव्वाच्या सव्वा भाडे आकारण्यास सुरुवात केली. त्यामुळे गरजू रुग्णांची होणारी परवड लक्षात घेऊन त्यांना फेरीबोटीने प्रवास करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे.

सध्या गेटवे ते मांडवा आणि भाऊचा धक्का ते मोरा-उरण या दरम्यान अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सुरू असलेल्या फेरीबोटींमधून रुग्णांना प्रवासाची मुभा दिली आहे. दररोज ६० ते ७० प्रवासी या सुविधेचा लाभ घेतात. यात कर्करोग, मधुमेह आणि अन्य दुर्धर आजारांशी झुंज देणाऱ्या रुग्णांचा समावेश आहे. त्यांना नियमित केमोथेरपी, डायलिसीस अशा उपचारांची गरज असते. त्यासाठी त्यांना मुंबईत येण्यावाचून गत्यंतर नाही. या प्रवाशांकडून कोणत्याही प्रकारचे भाडे घेतले जात नाही, अशी माहिती गेटवे-एलिफंटा जलवाहतूक सहकारी संस्थेचे सरचिटणीस किफायत मुल्ला यांनी दिली.

* जलवाहतूक पूर्ण क्षमतेने सुरू असल्याच्या अफवा...

महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाच्या सूचनेनुसार केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी फेरीबोटी सुरू ठेवल्या आहेत. काहीजणांकडून जलवाहतूक पूर्ण क्षमतेने सुरू असल्याच्या अफवा उठवल्या जात आहेत. सध्या दिवसातून तीन फेरीबोटी सोडल्या जात असून, उपचारांची नितांत आवश्यकता असलेल्या रुग्णांना संबंधित रुग्णालयाने दिलेली कागदपत्रे तपासल्यानंतरच प्रवास करू दिला जातो. अन्य कोणालाही परवानगी नाही, अशी माहिती मुंबई जलवाहतूक आणि औद्यागिक सहकारी संस्थेचे सरचिटणीस शराफत मुकादम यांनी दिली.

.............................................

Web Title: Water transport support to fellow patients during lockdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.