Join us

भाऊच्या धक्क्यावरून जलप्रवास महागला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 4:06 AM

मुंबई : भाऊच्या धक्क्यावरून जलप्रवास करणाऱ्यांच्या खिशावर आता अतिरिक्त ताण पडणार आहे. या मार्गावरील फेरीसेवेचे भाडे वाढविण्यास महाराष्ट्र मरिटाईम ...

मुंबई : भाऊच्या धक्क्यावरून जलप्रवास करणाऱ्यांच्या खिशावर आता अतिरिक्त ताण पडणार आहे. या मार्गावरील फेरीसेवेचे भाडे वाढविण्यास महाराष्ट्र मरिटाईम बोर्डाने परवानगी दिली असून, त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे.

इंधन दरवाढ आणि कोरोनाकाळात रोडावलेल्या प्रवासी संख्येमुळे तिकीट दरात वाढ करण्याची परवानगी मुंबई जलवाहतूक आणि औद्योगिक सहकारी संस्थेकडून करण्यात आली होती. या मागणीबाबत महाराष्ट्र मरिटाईम बोर्डाच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. त्यानंतर भाडेवाढीस हिरवा कंदील दाखविण्यात आला. दोन्ही मार्गावरील फेरीसेवेत सरासरी १० ते १५ रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली आहे.

महाराष्ट्र मरिटाईम बोर्डाने काढलेल्या आदेशानुसार, मुंबई ते मोरा, मुंबई ते मोरा (पावसाळी) आणि मुंबई ते रेवस या मार्गावरील जलवाहतुकीच्या तिकीट दरवाढीस समिती अहवालाच्या शिफारशीनुसार मान्यता देण्यात येत आहे. त्यास केंद्र आणि राज्य सरकारकडून अधिसूचित कर लागू राहतील. प्रवासी करामध्ये भविष्यात वाढ झाल्यास सुधारित कर लागू करण्यात येतील. पावसाळी हंगामात हवामान खात्याच्या इशाऱ्यांचा अंदाज घेऊन वेळापत्रकानुसार प्रवासी सेवा चालविण्यात यावी, अशी सूचनाही त्यात करण्यात आली आहे.

......

दरपत्रक असे (सर्व करांसहित)

मार्ग ...... आधीचे दर..... नवे दर (रुपयांत)

मुंबई-मोरा... ७०.... ८०

मुंबई-मोरा (पावसाळी)... ९०.... १०५

मुंबई-रेवस.... ९० .... १००

.......

सूचना काय?

- इनलँड व्हेसल ॲक्ट १९१७ मधील तरतुदीनुसार प्रत्येक प्रवासी बोटीवर प्रवासी क्षमतेनुसार लाईफ जॅकेट, जीवरक्षक संसाधने, संपर्क यंत्रणा सुस्थितीत ठेवण्यात यावीत.

- प्रवासी जलयाने निर्धारित वेळापत्रकानुसार सोडण्यात यावीत.

- कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने वेळोवेळी आखून दिलेल्या अटी आणि शर्थींचे पालन करावे.

.....

इंधन दरवाढीचा फटका गेल्या वर्षभरापासून बसत आहे. त्यात कोरोनामुळे प्रवासी संख्येत घट झाल्यामुळे जलवाहतुकीचे अर्थचक्र पूर्णतः थांबले आहे. फेरीबोट चालकांना यातून सावरता यावे, यासाठी तिकीट दरात वाढ करण्याची मागणी आम्ही महाराष्ट्र मरिटाईम बोर्डाकडे केली होती. त्यास अखेर मान्यता मिळाली.

- शराफत मुकादम, सरचिटणीस, मुंबई जलवाहतूक आणि औद्यागिक सहकारी संस्था