मुंबई : मुंबईलापाणीपुरवठा करणाऱ्या मुलुंडमधील जलवाहिनी ‘मुंबई २’ची गळती रोखण्याचे काम पालिकेकडून विक्रमी वेळेत पूर्ण करण्यात आल्यानंतर ठाणे येथील जलबोगद्याला लागलेली गळती रोखण्याचे काम उद्यापासून पालिका हाती घेणार आहे. या जलबोगद्यास ठाणे येथे कूपनलिकेच्या खोदकामामुळे हानी पोहोचली आहे.
या जलबोगद्याला गळती लागली असून ही गळती रोखण्यासाठी हा जलबोगदा पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे. या दुरुस्तीच्या काळात मुंबई शहर व उपनगराचा पाणीपुरवठा खंडित होणार असून मुंबई व ठाणे शहरातील काही भागात पाणीपुरवठा शुक्रवारपासून कपात करण्यात येणार आहे. हे काम वेळेत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवले असून त्यानुसार काम पूर्ण केले जाणार असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागातील जल अभियंत्यांनी दिली.
मुंबईत ३० दिवस १५ टक्के पाणी कपात
मुंबई महानगरपालिका अंतर्गत मुंबई शहर व उपनगराच्या एकूण पाणीपुरवठ्यापैकी सुमारे ६५ टक्के पाणीपुरवठा हा भांडुप संकुल येथील जलशुद्धीकरण केंद्राद्वारे केला जातो. या केंद्रास होणारा ७५ टक्के पाणीपुरवठा ५ हजार ५०० मिलीमीटर व्यासाच्या १५ किलोमीटर लांबीच्या जलबोगद्याद्वारे होतो. या जलबोगद्याच्या दुरुस्तीच्या कामामुळे ३१ मार्चपासून पुढील ३० दिवस मुंबईत १५ टक्के पाणीकपात करण्यात येणार आहे.