मुंबईकरांचे पाणी महागणार?; महापालिकेचा आठ टक्के पाणीपट्टीवाढीचा प्रस्ताव
By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2023 07:12 AM2023-11-18T07:12:52+5:302023-11-18T07:13:06+5:30
२५ नोव्हेंबरला निर्णय
मुंबई : येत्या काही दिवसांत मुंबईकरांना पाणीपट्टीवाढीला सामोरे जावे लागेल की नाही, यावर नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात शिक्कामोर्तब होईल. मुंबई महापालिकेचे आयुक्त प्रशासक इक्बालसिंह चहल यांनी यासंदर्भातील निर्णय २५ नोव्हेंबरला होईल, असे सांगितले. पाणीपट्टीवाढीचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. मात्र, अजून तरी प्रशासनाने मंजुरी दिलेली नाही, असेही ते म्हणाले. दरम्यान, पाणीपट्टीवाढीला प्रशासनाने मंजुरी दिल्याची जोरदार चर्चा असून, राज्य सरकार मात्र दरवाढीस अनुकूल नसल्याचे समजते. प्रस्ताव मंजूर झाल्यास २०२३-२४ या वर्षासाठी मुंबईकरांच्या पाणीपट्टीत ८ टक्क्यांपर्यंत वाढ होणार आहे. जून २०२३ च्या पूर्वलक्षी प्रभावाने ही दरवाढ लागू होईल.
पाणीपट्टीत प्रत्येक वर्षी कमाल आठ टक्क्यांपर्यंत वाढ करण्याचा निर्णय पालिकेने २०१२ सालीच घेतला होता. त्याबाबतचे अधिकार स्थायी समितीने प्रशासनाला दिले आहेत. या निर्णयाला अनुसरून पालिका प्रशासनाकडून दरवर्षी १६ जूनपासून पाणीपट्टीत वाढ केली जाते. मात्र, कोरोनामुळे २०२०-२१ आणि २०२१-२२ या दोन वर्षांत पाणीपट्टी, मालमत्ता कर तसेच अन्य करांमध्ये पालिकेने वाढ केली नव्हती. पाणीपट्टीत वाढ होण्याची विविध कारणे प्रस्तावात दिली आहेत. देखभाल खर्च, जलशुद्धीकरण तसेच आस्थापनातील वाढत्या खर्चामुळे पाणीपट्टीत वाढ केली जाते, असे प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे.
पाणीपट्टीवाढीची ही प्रमुख कारणे
भातसा धरणाच्या पाणीपुरवठ्यासाठी राज्य सरकारला देण्यात येणारी रॉयल्टी, जल शुद्धीकरण, वीजबिल तसेच अन्य खर्च लक्षात घेऊन पाणीपट्टीवाढीचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. यंदा या सर्व खर्चात ४४.६४ टक्के इतकी वाढ झाल्याने पाणीपट्टीत वाढ करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता.
पूर्वीचे दर आणि नवे प्रस्तावित दर
दरवाढ (प्रति हजार लिटर)
झोपडपट्ट्या, चाळी, कोळीवाडे,
गावठाण, आदिवासी पाडे - ४.७६ रु.
प्रस्तावित दर - ५.१४ रु.
झोपडपट्ट्यातील निवासी जलजोडण्या, प्रकल्पबाधित इमारती - ५.२८ रु.
प्रस्तावित दर - ५.७० रु.
इतर घरगुती ग्राहक (इमारत, बंगले व इतर घरगुती ग्राहक) - ६.३६ रु.
प्रस्तावित दर - ६.७८ रु.
व्यावसायिक ग्राहक - ४७.७५ रु.
प्रस्तावित दर - ५१.५७ रु.
बिगर व्यापारी संस्था - २५.४६ रु.
प्रस्तावित दर - २७.५० रु.
उद्योगधंदे, कारखाने - ६३.६५ रु.
प्रस्तावित दर - ६८. ७४ रु.
रेसकोर्स, थ्रीस्टार आणि त्यापेक्षा जास्त तारांकित हॉटेल - ९५.४९ रु.
प्रस्तावित दर - १०३.१३ रु.
बाटलीबंद पाणी कंपन्या - १३४.६४ रु.
प्रस्तावित दर - १४३.२५ रु.