हवेतील आर्द्रतेतून निर्माण होणार पाणी, टेरी आणि मैत्रीचे संशोधन
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2020 02:59 AM2020-03-16T02:59:19+5:302020-03-16T02:59:42+5:30
टेरी आणि मैत्री यांच्यातील या सहकार्यामुळे मेघदूत या उपकरणाद्वारे हवेतील आर्द्रता घनरूपात गोळा करून, त्यापासून सुरक्षित पिण्यायोग्य पाण्याची निर्मिती केली जाते.
मुंबई : एअर टू वॉटर तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पेयजलाची वैश्विक उपलब्धता पुरविण्यासंदर्भातील भारत सरकारच्या धोरणाबाबत द एनर्जी अँड रीसोर्स इन्स्टिट्यूट (टेरी) आणि मैत्री अॅक्वाटेकमध्ये सामंजस्य करार करण्यात आला आहे. भारतातील विविध प्रकारचा परिसर आणि वातावरणीय प्रदेशांमध्ये या तंत्रज्ञानाच्या अनुकूलतेची चाचपणी करणे हा या भागीदारीचा मुख्य उद्देश आहे. विशेष म्हणजे, याद्वारे हवेतील आर्द्रतेतून पाणी तयार करण्यावर भर देण्यात येत आहे.
टेरी आणि मैत्री यांच्यातील या सहकार्यामुळे मेघदूत या उपकरणाद्वारे हवेतील आर्द्रता घनरूपात गोळा करून, त्यापासून सुरक्षित पिण्यायोग्य पाण्याची निर्मिती केली जाते. टेरीचे फेलो डॉ. श्यामल कुमार सरकार यांनी या संदर्भात सांगितले, २०२४ सालापर्यंत प्रत्येक ग्रामीण घरात नळाद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. हे तंत्रज्ञान उपयुक्त ठरल्यास जनजागृतीसाठी प्रयत्न केले जातील. मैत्रीचे संस्थापक एम. रामकृष्ण यांनी सांगितले, मेक इन इंडिया उपक्रमांतर्गत पहिले एअर टू वॉटर तंत्रज्ञान विकसित केले आहे.
मेघदूत काय करते?
मेघदूत हे भूजल स्रोतांवरील अवलंबित्व कमी करण्याच्या दृष्टीने तयार करण्यात आले आहे. यासाठी वातावरणातील आर्द्रतेचा वापर केला जातो. आर्द्रतेपासून मिळालेल्या जलकणांमधील सर्व प्रकारची अशुद्धी आणि दुर्गंधी काढून टाकण्यासाठी या तंत्रज्ञानात अत्यंत गुंतागुंतीची अशी शुद्धिकरण प्रणाली आहे. सूक्ष्म, लघू व मध्यम आकाराच्या उद्योगांपासून मोठे उद्योग समूह, शैक्षणिक संस्था, रुग्णालये, विमानतळ, निवासी जागा अशा सर्व ठिकाणांच्या पाण्याच्या गरजा या तंत्रज्ञानामुळे भागविल्या जाऊ शकतात.
वातावरणात ३७.५ दशलक्ष अब्ज गॅलन्स पाणी आर्द्रतेच्या स्वरूपात असते. पाण्याची जागतिक गरज भागविण्यासाठी यापैकी जेमतेम एक टक्क्याची आवश्यकता आहे.
मैत्रीच्या म्हणण्यानुसार, हे तंत्रज्ञान भारतीय रेल्वे, लष्कर, खासगी संस्था, हॉस्पिटल, निवासी संकुले अशा अनेक ठिकाणी यशस्वीरीत्या बसविण्यात आले आहे.
डोंगराळ प्रदेश, वाळवंट, बेटे अशा दुर्गम भागातील रहिवाशांना पाणीपुरवठा करण्यासाठी या तंत्रज्ञानाचा परिणामकारक वापर होऊ शकतो.