Join us

पाण्यावरही चालणार, रस्त्यावरही धावणार...

By admin | Published: April 21, 2016 3:06 AM

रस्त्यावर आणि पाण्यावरही चालू शकणारी ‘अ‍ॅम्फिबियन बस’ (उभयचर) येत्या आॅगस्ट महिन्यापर्यंत मुंबईत आणण्याचे प्रयत्न जेएनपीटी (जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट) आणि एमटीडीसीकडून

मुंबई : रस्त्यावर आणि पाण्यावरही चालू शकणारी ‘अ‍ॅम्फिबियन बस’ (उभयचर) येत्या आॅगस्ट महिन्यापर्यंत मुंबईत आणण्याचे प्रयत्न जेएनपीटी (जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट) आणि एमटीडीसीकडून (महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ) सुरू आहेत. या बसची बांधणी सध्या परदेशात होत असून, काम अंतिम टप्प्यात आले आहे. मुंबईकरांना आणि खासकरून पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी अ‍ॅम्फिबियस बसची संकल्पना अमलात आणण्याचा निर्णय एमटीडीसीकडून घेण्यात आला होता. परदेशात अशा प्रकारची बस सुरू असून, त्याच धर्तीवर ही संकल्पना मुंबईत राबवण्याचा निर्णय झाला आहे. यासाठी जेएनपीटी आणि एमटीडीसीमध्ये अ‍ॅम्फिबियन बसची सेवा देण्यासाठी सामंजस्य करारही करण्यात आला आहे. सध्या एकच बस मुंबईत आणली जाणार असून, त्याची बांधणी अमेरिकेत केली जात आहे, तर त्याचे इंजीन आणि अन्य इलेक्ट्रिकल फिटिंग हे स्वीडनकडून होईल, अशी माहिती जेएनपीटीतील सूत्रांकडून देण्यात आली. अत्यंत अत्याधुनिक अशी ही बस असणार असून, यामध्ये सर्व प्रकारच्या सुविधा, तसेच सुरक्षिततेसाठी सर्व प्रकारची खबरदारी यात घेतलेली असेल, अशी माहिती देण्यात आली. या बसची किंमत जवळपास चार कोटी रुपये असून, ती ५0 प्रवासी आसनांची असेल. सध्या बसच्या कामाला वेग आला असून, आॅगस्ट महिन्यापर्यंत ती मुंबईत आणण्यासाठी जेएनपीटी आणि एमटीडीसीचे प्रयत्न आहेत. या बसच्या चाचण्या करून आॅक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यापासून पर्यटक व मुंबईकरांच्या सेवेत आणली जाईल.