दक्षिण मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटणार; कामासाठी निविदा प्रक्रिया सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2024 09:54 AM2024-07-15T09:54:21+5:302024-07-15T09:55:51+5:30
दक्षिण मुंबईतील पाणीपुरवठा अधिक सक्षम करण्यात येणार आहे.
मुंबई : दक्षिण मुंबईतील पाणीपुरवठा अधिक सक्षम करण्यात येणार आहे. महत्त्वाचे म्हणजे महापालिका ई विभागातील पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे काम हाती घेणार आहे. त्यासाठी जल विभागाने निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. पालिका एकूण ११ कोटी ४८ लाख ८२ हजार ५०० कोटी रुपये खर्च करणार आहे.
ई विभागात माझगाव, भायखळा, मुंबई सेंट्रल, आग्रीपाडा, वाडी बंदर आदी परिसर येतो. तसा हा परिसर ऐतिहासिक तसेच सांस्कृतिक महत्त्वाचा मानला जातो. ब्रिटिशकालीन बैठी घरे, बीडीडी चाळी या भागात मोठ्या प्रमाणावर आहेत. शिवाय झोपड्यांची संख्याही मोठी आहे. त्यामुळे येथील रहिवासी संख्याही अधिक आहे. त्यामुळे सध्याचा पाणीपुरवठा अपुरा असल्याच्या तक्रारी आहेत.
दुसरीकडे, हा परिसर शैक्षणिक संस्थांचे माहेरघर आहे. येथे सेंट पीटर्स हायस्कूल, सेंट मेरी हायस्कूल, सेंट इझाबेल, सर एली कदुरी हायस्कूल, म्युनिसिपल स्कूल, ग्लोरिया कॉन्व्हेंट हायस्कूल, ख्राईस्ट चर्च स्कूल, अँटोनिया डिसिल्व्हा हायस्कूल, रेजिना पॅसिस कॉन्व्हेंट हायस्कूल, एन्झा स्पेशल स्कूल, मौलाना आझाद हायस्कूल, ह्युम हायस्कूल यांसारख्या शैक्षणिक संस्था आहेत. तसेच वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालय, भायखळा, भाऊचा धक्का, कुआन कुंग चायनीज टेम्पल, जोसेफ बाप्टिस्टा गार्डन, माझगाव टेकडी गावदेवी मंदिर, म्हातारपाखडी यांसारखी स्थळेही आहेत. शिवाय कस्तुरबा, नायर, जे. जे., सेंट्रल रेल्वे हॉस्पिटल, प्रिन्स अली खान हॉस्पिटल, मसिना हॉस्पिटल यांसारखी रुग्णालये आहेत.
नव्या जलवाहिन्या-
१) पाणी पुरवठ्यात सुधारणा करण्यासाठी विविध कामे केली जाणार आहेत.
२) त्यात नव्या पाइपलाइन टाकणे, पाण्याची गळती थांबवणे आदींचा समावेश आहे. यासाठी जल विभागाने निविदा प्रक्रिया सुरू करून अर्जही मागवले आहेत.
अतिरिक्त पाण्याची गरज-
१) दक्षिण मुंबईत पुनर्विकासाची सर्वाधिक कामे सुरू आहेत. त्यातही ई विभागातील कामे अधिक आहेत.
२) अतिरिक्त पाण्याची गरज दिवसेंदिवस वाढत आहे. वाढती गरज भागवण्यासाठी पालिकेला मोठी कसरत करावी लागत आहे.