Join us  

मुंबईकरांची पाणीचिंता मिटली; दमदार पावसामुळे सातही तलावांतील पाणीसाठा ९८ टक्के

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2023 6:42 AM

ऑगस्ट महिन्यात पावसाने ओढ दिल्यामुळे मुंबईवर पाणी कपातीची टांगती तलवार होती. सप्टेंबर महिन्यात याबाबत निर्णय घेण्याच्या मानसिक तयारीत पालिका प्रशासन होते.

मुंबई - मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावातील पाणीसाठा ९८ टक्क्यांच्या वर गेल्यामुळे  पुढल्या पावसाळ्यापर्यंत पाण्याची चिंता मिटल्यात जमा आहे. गेल्या वर्षी तलावात जेवढा पाणीसाठा होता, जवळपास तेवढेच पाणी तलावात आहे. गत वर्षीच्या तुलनेत यंदा तलावातील पाण्याची पातळीही बऱ्यापैकी आहे.

सात पैकी चार तलाव जुलै महिन्यातच  पूर्ण भरले आहेत. मात्र, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, भातसा हे तलाव अजूनही पूर्ण भरलेले नाहीत. मात्र, तलावातील पाणीसाठा समाधानकारक म्हणावा असा आहे. ऑगस्ट महिन्यात पावसाने ओढ दिल्यामुळे मुंबईवर पाणी कपातीची टांगती तलवार होती. सप्टेंबर महिन्यात याबाबत निर्णय घेण्याच्या मानसिक तयारीत पालिका प्रशासन होते. मात्र, सप्टेंबर महिन्यात मुंबईसह तलाव क्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने पाणी कपातीचे संकट दूर झाले. अजूनही पावसाची रिपरिप सुरूच आहे. त्यामुळे तलावातील पाणी पातळीत काही प्रमाणात वाढ होत आहे. गेल्या वर्षी तलावात असलेला पाणीसाठा आणि यंदाचा पाणीसाठा यात फार मोठा फरक राहिलेला नाही.

सप्टेंबरमध्येही चांगला पाऊस गेल्या काही दिवसांपासून तलाव क्षेत्रात पावसाची संततधार कायम आहे. रोज किमान ३० ते ५० मिलीमीटर पावसाची नोंद होत आहे. हा पूर्ण महिना तलाव क्षेत्रात पाऊस मुक्काम ठोकून असेल असा अंदाज आहे. त्यामुळे पाणी साठ्यात किंचित का होईना पण वाढ होईल. 

टॅग्स :पाणीमुंबई महानगरपालिकापाऊस