मुंबई : ऐन दिवाळीत मुंबईतील पाणीकपात रद्द करत मुंबईकरांना जणू दिवाळीची भेट महापालिकेने दिली आहे. गुरुवारी झालेल्या गटनेत्यांच्या बैठकीत १०, १२ आणि १३ नोव्हेंबर रोजी मुंबईत पाणीकपात न करण्याचा निर्णय घेण्यात आला.मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही तलाव क्षेत्रात पावसाळ्यात पुरेसा पाऊस झालेला नाही. परिणामी महापालिकेने भविष्यातील पाणीटंचाईचा विचार करत मुंबईत २० टक्के पाणी कपात लागू केली. पूर्व आणि पश्चिम उपनगरातील नागरिकांना पाणी कपातीची चांगलीच झळ बसू लागली. शिवाय पूर्व उपनगरात डोंगर उतारावर वास्तव्य करणाऱ्या रहिवाशांची तर तारांबळ उडाली. आता ही पाणीकपात पुढील पावसाळ्यापर्यंत कायम ठेवण्यात येणार आहे. मात्र सणासुदीला मुंबईकरांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागू नये, म्हणून महापालिकेने मुंबईकरांना दिलासा देण्याचे काम केले आहे. यापूर्वी गणेशोत्सवादरम्यानही पहिल्या आणि शेवटच्या दिवशी पाणीकपात रद्द केली होती. दिवाळीतही ही कपात रद्द करण्याची मागणी करण्यात आली होती.पाण्यासाठी बैठकपाणीकपातीच्या मुद्द्यावर गुरुवारी पालिका मुख्यालयात गटनेत्यांची बैठक पार पडली. यात सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव यांनी महापौर स्नेहल आंबेकर यांना दिवाळीत पाणीकपात रद्द करण्याबाबतचे पत्र दिले. त्यानंतर १०, १२ आणि १३ नोव्हेंबर रोजी पाणीकपात रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.
दिवाळीपुरती पाणीकपात रद्द
By admin | Published: November 06, 2015 3:17 AM