अंधेरी पूर्वमध्ये पाणीबाणी; रहिवाशांची पाण्यासाठी वणवण, अनधिकृत नळ जोडणी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2019 06:37 AM2019-05-15T06:37:59+5:302019-05-15T06:39:52+5:30

देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळख असलेल्या मुंबईलाही आता पाण्याची समस्या भेडसावण्यास सुरूवात झाली आहे.

Waterfall in east Andheri; Water polling for residents, unauthorized tap connection | अंधेरी पूर्वमध्ये पाणीबाणी; रहिवाशांची पाण्यासाठी वणवण, अनधिकृत नळ जोडणी

अंधेरी पूर्वमध्ये पाणीबाणी; रहिवाशांची पाण्यासाठी वणवण, अनधिकृत नळ जोडणी

Next

- योगेश जंगम

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळख असलेल्या मुंबईलाही आता पाण्याची समस्या भेडसावण्यास सुरूवात झाली आहे. मुंबईच्या मध्यवर्ती आणि महत्वाच्या अंधेरी पूर्व येथे मोठ्या प्रमाणावर विविध कंपन्यांची कार्यालये आणि व्यापारी गाळे आहेत. यासह याठिकाणी रहिवासी वस्तीही मोठ्या प्रमाणावर आहे, मात्र रहिवासी वस्तीला कमी दाबाने होत असलेल्या पाणी पुरवठ्यामुळे रहिवासी त्रस्त झाले आहेत. अंधेरी पूर्व येथील गुंदवली, पंपहाऊस, मोगरापाडा, आंबेवाडी, ख्रिश्चनवाडी, डीसिल्वा वाडी, मरोळ शिवाजी नगर, पंचशील नगर, भंडारवाडा तर जोगेश्वरीतील शंकरवाडी येथील लोकवस्तीला सध्या पाण्याची भीषण समस्या भेडसावत आहे. अंधेरी पूर्व येथे महापालिकेचे के पूर्व कार्यालयही आहे, मात्र या कार्यलच्या शंभर मीटरच्या आत असलेल्या गुंदवली परिसरामध्येही पाण्याचे मोठ्या प्रमाणावर हाल होत असल्याने रहिवासी बेहाल झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून पवई जलाशयाच्या येथे मोठ्या पाईप लाईनच्या दुरूस्तीचे काम करण्यात येत आहे, हे काम अजून काही दिवस चालणार असल्याने काही भागांमध्ये पाणी पुरवठा कमी प्रमाणामध्ये होत असल्याचे महापालिकेच्या जल विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.

यंदा कमी पडलेला पाऊस, अनधिकृत जलजोडणी, टँकर माफिया, पाणी गळती, जुन्या-गंजलेल्या पाईप लाईन आणि सध्या असलेली पाणी कपात यामुळे बहुतांश भागांमध्ये पाणी पुरवठा कमी दाबाने तर काही भागांमध्ये पाणी पुरवठा होत नसल्याने अंधेरी पूर्वमध्ये आता पाणीबाणी सारखी स्थिती निर्माण झाली आहे. रहिवाशांना पाण्यासाठी वनवण फिरावे लागत आहे. या समस्येवर तोडगा काढण्यात अथवा उपाययोजना राबवून समस्या दूर करण्यात महापालिकेला अदयाप तरी अपयश आले असल्याचे दिसत आहे. यामुळे महापालिकेने मुंबईला चोविस तास पाणी पुरवठा करण्याचा केलेला दावा फोल ठरताना दिसत आहे.

जगण्यासाठी अत्यावश्यक म्हणजे पाणी, मात्र ही अत्यावश्यक सेवा पुरवण्यास महापालिकेला का कुठे कमी पडत आहे किंवा नेमके कारण काय याचा विचार महापालिकेने करण्याची गरज आहे. अंधेरी पूर्व आणि जोगेश्वरी पूर्व येथे कमी दाबाने पाणी पुरवटा होत असल्याने रहिवासी त्रस्त झाले आहेत. काही ठिकाणी अजिबात पाणी पुरवठा होत नसल्याने दुसऱ्या भागांतून पाणी भरावे लागत आहे. आधीच तापमानामध्ये कमालीची वाढ झाली असल्याने दुपारच्या सुमारास दुसºया भागातून पाणी भरताना रहिवासी हैराण होत आहेत. पाण्याची कमतरता असल्याने विद्यार्थांसह ज्येष्ट नागरिकही पाण्यासाठी घराबाहेर पडत आहेत. अंधेरीतील कार्यालये आणि व्यावसायिक गाळ्यांना व्यवस्थित पुरवठा होत असताना येथील चाळी आणि रहिवासी विभागालाच कमी पाणी पुरवठा का ? असा सवाल संपप्त रहिवाशांमार्फत उपस्थित करण्यात येत आहे.



पंपहाउस - पाटील वाडीतही पाण्याची समस्या
पंपहाउस, पाटीलवाडी येथे पाण्याचे खूपच त्रास सहन करावा लागत आहे. या ठिकाणी मोठी वस्ती असताना फक्त पाच हजार लिटरच्या टाकीच्या सहाय्याने पाणी पुरवठा होत आहे, मात्र हे पाणी कमी दाबाने आणि खूपच कमी येत असल्याने येथील रहिवाशांचे खूपच हाल होत आहेत. आम्हाला टाकीच्या सहाय्याने पाणी पुरवठा न करता थेट पाणी पुरवठा करण्यात यावा अशी आमची मागणी आहे. आम्ही बर्याच वेळा महापालिकेशी संपर्क केला मात्र अद्याप परिस्थिती कायम आहे.
- कल्पना परमार, रहिवासी, पंपहाऊस.

पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी पाठपुरावा
ह्युमन राईटच्या माध्यमातून पाण्याच्या समस्येबाबत पाठपुरावा केला आहे, मात्र अद्याप काहीच फरक पडलेला नाही. काही दिवसांपुर्वी स्वाक्षरी मोहीमही राबवली. अंधेरी विभागातील विहीरी दिवसेंदिवस बुजवण्यात येत आहेत. या विहीरींचे जतन करण्यासाठी आणि उपाययोजना राबवण्यासाठी आणि सर्व विभागांमध्ये पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी आम्ही महापालिकेसोबत पाठपुरावा करणार आहोत. - धर्मेश विशारिया, मुंबई प्रभारी, भारतीय मानवाधिकार फेडरल पार्टी.

शंकरवाडीतही पाण्याची समस्या
शंकरवाडीमध्येही काही भागांत पाण्याची मोठी समस्या आहे. दुपारच्या सुमारास एक तास खूप कमी दाबाने पाणीपुरवठा होतो. मात्र या ठिकाणी २00 ते २५0 घरे असल्याने हा पाणीपुरवठा पुरेसा होत नाही. येथील वीर बहादूर चाळीतील काही घरांमध्ये तर अजिबात पाणी येत नाही यामुळे येथील रहिवाशांना भर उन्हामध्ये दुसºया भागातून पाणी भरावे लागते. आम्ही महापालिकेसोबत याबाबत पाठपुरावा करणार आहोत.
- दीपक मनोहर घाडी,
स्थानिक रहिवासी.

महापालिका सपशेल अपयशी
फक्त उन्हाळा आहे म्हणून नाही तर हिवाळ्यामध्येही अंधेरी पूर्वमध्ये बहुतांश भागांमध्ये पाण्याची मोठी समस्या भेडसावत आहे. ही समस्या पाणी माफिया, अनधिकृत नळ जोडणी यांमुळे भेडसावत असून महापालिकेचे अधिकारी जाणूनबुजून याकडे दुर्लक्ष करीत आहेत. आम्ही वर्षभरापासून महापालिकेच्या साहाय्यक आयुक्तांसोबत याबाबत पत्रव्यवहार करीत आहोत, मात्र पाण्याच्या या समस्येवर तोडगा काढण्यास महापालिका अपयशी ठरली आहे. आम्ही संपुर्ण अंधेरी पूर्वमध्ये पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी पुढेही महापालिकेसोबत पत्रव्यवहार सुरू ठेवून पाठपुरावा करणार आहोत.
- रोहन विजय सावंत,
विभाग अध्यक्ष, मनसे.

Web Title: Waterfall in east Andheri; Water polling for residents, unauthorized tap connection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Waterपाणी