पाणीबाणी! आजही मुसळधार! घराबाहेर पडू नका, प्रशासनाचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2017 05:46 AM2017-08-30T05:46:55+5:302017-08-30T05:48:02+5:30

Waterfall! Even today! Do not come out of the house, appeal to the administration | पाणीबाणी! आजही मुसळधार! घराबाहेर पडू नका, प्रशासनाचे आवाहन

पाणीबाणी! आजही मुसळधार! घराबाहेर पडू नका, प्रशासनाचे आवाहन

googlenewsNext

मुंबई : मुसळधार संततधारेच्या रूपात मंगळवारी कोसळलेल्या वरुणराजाने मुंबईकरांची पुरती दाणादाण उडवली. मुंबईची लाइफलाइन म्हणून ओळख असलेल्या रेल्वे वाहतुकीसह रस्ते वाहतूकही या वेळी ठप्प पडली आणि पाण्यात गेलेल्या मुंबईने पुन्हा एकदा मुंबईकरांना ‘२६ जुलै‘ची धडकीच भरली. मुंबई-नागपूर दुरोंतो एक्स्प्रेसचे डबे सकाळीच घसरल्याने बाहेरगावी जाणाºया गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले होते. त्यात मुंबईत सकाळपासून जोर धरलेल्या पावसाने दुपारनंतर कहर सुरू केला. अवघ्या काही मिनिटांतच चहूबाजूंनी मुंबईला पावसाचा वेढा बसला. त्यात समुद्रात भरती असल्याने पाण्याचा निचरा थांबला. परिणामी, शहरासह उपनगरात ठिकठिकाणी पाणी साचू लागले. अखेर काही तासांतच मुंबईतील रस्ते वाहतूक ठप्प झाली. महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, दुपारपर्यंत १०० मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती. महापालिकेचे अधिकारी, अभियंते आणि कर्मचारी रस्त्यांवर परिस्थिती नियंत्रणाचा अयशस्वी प्रयत्न करत होते. मात्र परिस्थिती पूर्णत: हाताबाहेर गेली होती. 

येत्या २४ तासांत मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे जिल्हा येथे मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. नागरिकांनी अतिमहत्त्वाच्या कामाशिवाय घराबाहेर पडू नये तसेच मच्छीमार बांधवांनीही समुद्रात जाऊ नये, असे आवाहन मंत्रालय, नियंत्रण कक्षाकडून करण्यात आले आहे. एकंदरीतच मंगळवारी मुंबईकरांना झोडपून काढलेला पाऊस बुधवारीही मुंबईकरांना धडकीच भरविणार असल्याचे चित्र आहे.

प्रवाशांच्या
ट्रॅकवर उड्या
मध्य आणि पश्चिम रेल्वेचे ट्रॅक पाण्याखाली गेल्याने दु. १२नंतर सेवा ठप्प पडली होती. त्यामुळे प्रवाशांनी इच्छीत स्थळी पोहोचण्यासाठी थेट ट्रॅकवरच उड्या घेतल्या. ट्रॅकशेजारील खड्ड्यांत पडू नये, म्हणून प्रवासी ट्रॅकच्या मधोमध चालताना दिसले.


वाहनांच्या प्रतीक्षेत
महापुराची कल्पना आल्यानंतर कार्यालयातून घराकडे धाव घेतलेल्या मुंबईकरांनी रेल्वे स्थानकांसह बस थांब्यांवर दुपारी तुफान गर्दी केली होती. वाहतूककोंडीत अडकलेल्या वाहनांमुळे प्रतीक्षेशिवाय मुंबईकरांना दुसरे काही करता आले नाही. अखेर मिळेल त्या साधनाने मुंबईकरांनी रात्री उशिरा घराकडे कूच केली.

भरतीने परिस्थिती अधिक बिकट
सकाळपासून सुरू असलेल्या संततधारेमध्ये सायंकाळी साडेचारच्या सुमारास आलेल्या भरतीने परिस्थिती अधिक बिकट झाली. रात्री उशिरापर्यंत पावसाचा जोर कमी झाल्यानंतरही मुंबई जलमय असल्याचे चित्र होते.

आज शाळा, कॉलेज बंद
अनेक विद्यार्थी शाळेतच अडकले
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईत मंगळवारी सकाळपासून झालेल्या पावसामुळे जागोजागी पाणी साचले होते. तसेच बुधवारीही पाऊस सुरू राहणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.
त्यामुळे विद्यार्थ्यांचे हाल होऊ नयेत म्हणून मुंबई आणि उपनगरातील शाळा आणि महाविद्यालये बुधवारी बंद ठेवण्याचा निर्णय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी घेतला. पण, मंगळवारी सुरू असलेल्या पावसामुळे काही विद्यार्थी शाळेतच अडकून राहिले होते.
गणेशोत्सव सुरू असल्यामुळे काही महाविद्यालये आणि शाळांनी पाच दिवसांची सुटी दिली होती. त्यामुळे मंगळवारपर्यंत असलेल्या सुटीमुळे विद्यार्थ्यांना कमी फटका बसल्याचे चित्र दिसून आले.
मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी शाळा आणि महाविद्यालयांमध्येही पाणी साचल्याचे चित्र दिसून आले. त्यामुळे अनेक ठिकाणी परिस्थिती चिंताजनक झाली होती.

Web Title: Waterfall! Even today! Do not come out of the house, appeal to the administration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.