मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये १५ टक्के कमी जलसाठा आहे. त्यामुळे उन्हाळ्यात पाणीबाणी निर्माण होण्याची शक्यता असल्याने, महापालिका प्रशासनाने पुढच्या पावसाळ्यापर्यंत मुंबईच्या पाणीपुरवठ्यात १५ नोव्हेंबरपासून सरसकट दहा टक्के पाणीकपात लागू केली आहे. त्यामुळे पाणी येण्याच्या वेळेत १५ टक्के कपात असणार आहे. ही कपात पाण्याच्या निवासी, व्यवसायिक व औद्योगिक वापरावरही लागू असणार आहे.
मुंबईला वर्षभर पाणीपुरवठा होण्यासाठी सात प्रमुख तलावांमध्ये १ आॅक्टोबर रोजी १४ लाख ४७ हजार दशलक्ष लीटर जलसाठा असणे आवश्यक होते. मात्र, जुलै आणि आॅगस्टच्या पंधरवड्यात जोरदार बरसणाºया पावसाने सप्टेंबर महिन्यात पाठ फिरविली. परतीच्या पावसानेही दगा दिल्याने, १ आॅक्टोबर रोजी तलावांमध्ये १३ लाख १७ हजार दशलक्ष लीटर म्हणजे ९ टक्के कमी जलसाठा होता. १ नोव्हेंबर रोजी जलसाठ्यातील तफावत आणखी वाढली.