सचिन लुंगसे, मुंबईसुमारे १२.५ दशलक्ष नागरिकांना दररोज ३ हजार ५०० दशलक्ष लिटर्स इतका पाणीपुरवठा केला जातो. मात्र पावसाने ओढ दिल्याने पाणीपुरवठ्याची स्थिती फारशी काही आशादायक नाही. २० टक्के पाणीकपात लागू झाल्यानंतरही परिस्थिती जैसे थे राहिली तर महापालिका प्रशासनाने ३० टक्के पाणीकपातीचे संकेत दिले आहे. परंतु तरीही पुढील आठ महिन्यांचा विचार करता प्रशासनाने पाणीबचतीसाठी संकल्पना हाती घेतल्या असून, ‘पाणीबाणी’च्या पार्श्वभूमीवर अशाच काही संकल्पनांचा ‘लोकमत’ने घेतलेला हा खास आढावा वाचकांसाठी.मुंबईला केल्या जाणाऱ्या पाणीपुरवठ्याच्या सुमारे ३० टक्के म्हणजेच प्रतिदिन ९०० दशलक्ष लिटर्स पाण्याचा अंदाजित अपव्यय होतो. सध्या मुंबईची लोकसंख्या सुमारे १२.५ दशलक्ष आहे आणि २०३१ सालापर्यंत पाण्याची अंदाजित मागणी प्रतिदिनी ६ हजार दशलक्ष लिटर्स एवढी असणार आहे. आजघडीला विचार करीत मुंबईत २० टक्के पाणीकपात लागू झाल्यानंतर मुंबईकरांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. डोंगरउतारावर वास्तव्य करणाऱ्या रहिवाशांना तर धडकी भरली असून, पाण्याचा दाब कमी झाल्याने त्यांच्या पाण्याचा प्रश्नही तोंड आ वासून उभा राहिला आहे. झोपडपट्ट्यात यापूर्वीपासूनच पाण्याची बोंब असून, पाणीकपातीमुळे झोपडीधारकांचे हाल होत आहेत. विशेषत: पूर्व उपनगरांत घाटकोपर आणि भांडुप परिसरातील पाण्याच्या वेळा बदलल्याने तेथील रहिवासी त्रस्त झाले असून, समान दाबाने पाणी मिळावे, अशी मागणी यापूर्वीच तेथील स्थानिक प्रतिनिधींनी प्रशासनाकडे केली आहे. त्यामुळे त्यांचे हाल लवकरात लवकर संपण्याची गरज आहे. (प्रतिनिधी) संयुक्त राष्ट्र संघाच्या आमसभेत २८ जुलै २०१० रोजी स्वच्छ व शुद्ध पिण्याचे पाणी हा प्रत्येक मानवाचा मानवी अधिकार आहे, असे मान्य करण्यात आले आहे. भारतानेही या प्रस्तावाच्या बाजूने मतदान करून आपली सहमती दर्शविली होती. प्रत्यक्षात मात्र प्रत्येकालाच समान पाणी मिळत नाही, अशी अवस्था आहे.मुंबईकरांकडून समुद्रात दररोज ७७४ दशलक्ष लिटर सांडपाणी सोडले जात आहे. दुर्दैव म्हणजे समुद्रात सोडल्या जाणाऱ्या या सांडपाण्यावर महापालिका कोणत्याही प्रकारची प्रक्रिया करीत नाही. या पाण्यावर प्रक्रिया झाली तर त्याच पाण्याचा पुनर्वापर करता येईल.सार्वजनिक, खाजगी उद्यानांना नवीन जलजोडणी नाही, तरण तलावांचा पाणीपुरवठाही बंद. जलसाठ्यात पुरेशी सुधारणा होईपर्यंत सार्वजनिक, खाजगी उद्यानांना नवीन जलजोडणी दिली जाणार नाही.२४ विभागांतील संबंधित अभियंत्यांना त्यांच्या विभागातील पाणीपुरवठ्याची नियमित स्वरूपात पाहणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.पाहणीदरम्यान पाणीपुरवठा, पाणीगळती, आदी सर्व संबंधित बाबींची पाहणी करून आवश्यक व योग्य ती तातडीची उपाययोजना आणि कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.पाणीपुरवठा करणारे महापालिकेचे टँकर्स हे केवळ निवासी भागातील पाण्याची गरज भागविण्यासाठी वापरण्यात येणार आहेत.ज्या ग्राहकांच्या जलजोडणींवरील खासगी मीटर्स कार्यरत नाहीत, ते मीटर्स तातडीने बदलविण्याबाबत संबंधित जलजोडणीधारकांना कळविण्यात येणार आहे.
‘पाणीबाणी’वर होणार मात
By admin | Published: September 14, 2015 3:17 AM