वडाळा, सायन, कुर्ला, चेंबूर जलमय, पाणी तुंबणार नसल्याचे पालिकेचे दावे गेले वाहून

By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2020 02:18 AM2020-07-06T02:18:04+5:302020-07-06T02:18:38+5:30

वडाळा येथील चार रस्ता, सायन येथील गुरुकृपा हॉटेल समोरील रस्ता, कुर्ला पूर्व येथील ठक्कर बाप्पा, कुर्ला सिग्नल तसेच चेंबूरच्या सुमननगर, उमरशी बाप्पा चौक, सिंधी कॅम्प, टिळकनगर पोस्टल कॉलनी या परिसरांमध्ये दुपारपर्यंत पाणी साचले होते.

waterlogged in Wadala, Sion, Kurla, Chembur | वडाळा, सायन, कुर्ला, चेंबूर जलमय, पाणी तुंबणार नसल्याचे पालिकेचे दावे गेले वाहून

वडाळा, सायन, कुर्ला, चेंबूर जलमय, पाणी तुंबणार नसल्याचे पालिकेचे दावे गेले वाहून

Next

मुंबई : जून महिन्यात काहीशी विश्रांती घेतल्यानंतर जुलैच्या पहिल्याच आठवड्यात पावसाने दमदार हजेरी लावली. रविवारी पहाटेपासूनच मुंबईत मुसळधार पावसाला सुरुवात झाली. वडाळा, सायन, कुर्ला व चेंबूर भागातील अनेक रस्त्यांवर पाणी साचले. रविवारी रस्त्यांवर नागरिकांची वर्दळ कमी होती. वाहनचालकांना साचलेल्या पाण्याचा त्रास सहन करावा लागला.

वडाळा येथील चार रस्ता, सायन येथील गुरुकृपा हॉटेल समोरील रस्ता, कुर्ला पूर्व येथील ठक्कर बाप्पा, कुर्ला सिग्नल तसेच चेंबूरच्या सुमननगर, उमरशी बाप्पा चौक, सिंधी कॅम्प, टिळकनगर पोस्टल कॉलनी या परिसरांमध्ये दुपारपर्यंत पाणी साचले होते. या रस्त्यांवर वाहतुकीचाही खोळंबा झाला होता. सकाळच्या सुमारास पावसाचा जोर एवढा होता की चेंबूर येथील सायन-पनवेल मार्गावर दृश्यमानता कमी झाली होती. काही वाहनचालकांनी गाडी रस्त्याच्या कडेला पार्क केली होती, तर काही वाहनचालक पार्किंग दिवे चालू ठेवत कमी वेगात साचलेल्या पाण्यातून मार्ग काढत होते. दुपारनंतर पावसाचा जोर ओसरल्याने रस्त्यांवर साचलेले पाणी कमी झाले.

पडझड सुरू असतानाच लागली आग
कुर्ला पश्चिमेकडील बैलबाजार येथील एका दुकानावर रविवारी सकाळी ८ वाजता झाड पडल्याची घटना घडली. विक्रोळी पार्कसाइट येथील ३५ माळ्यांच्या इमारतीच्या १९व्या मजल्यावरील साइन बोर्डला शनिवारी रात्री ८ वाजता आग लागली. पावणेनऊ वाजण्याच्या सुमारास ही आग विझली. कांदिवली येथील बंदर पाखाडी रोडवरील एका दुकानाला शनिवारी मध्यरात्री सव्वाएक वाजता लागलेली आग रविवारी पहाटे पावणेचारच्या सुमारास विझवण्यात यश आले.

कुलाबा, नरिमन पॉइंट येथे रविवारी सकाळी ७ वाजेपर्यंत सरासरी १० मिलीमीटर पावसाची नोंद झाली, तर दुसरीकडे पूर्व आणि पश्चिम उपनगरात मात्र पावसाचे प्रमाण कमी होते. सकाळी नऊनंतर मात्र पूर्व आणि पश्चिम उपनगरात पावसाचा जोर वाढला.
सकाळी १० वाजेपर्यंत धारावी, दादर, वडाळा येथे सरासरी २० मिलीमीटर पाऊस पडला. कुर्ला, विक्रोळी, चेंबूर, मानखुर्द, भांडुप, गव्हाणपाडा, मुलुंड येथे सरासरी ३० मिलीमीटर पावसाची नोंद झाली. विलेपार्ले, मरोळ, वांद्रे, अंधेरी, दिंडोशी येथे सरासरी ४० मिलीमीटर पाऊस पडला. सकाळी ९ ते ११ दरम्यान पावसाचा जोर वाढल्याने या सर्व परिसरात सरासरी पावसाची नोंद ५० मिलीमीटरच्या आसपास पोहोचली.

येथे साचले पाणी
हिंदमाता, काळबादेवी, भायखळा, वडाळा, अंधेरी, साकीविहार रोड, चेंबूर येथील सखल भागांत पाणी साचले होते.
महापालिकेने वेगाने येथील साचलेल्या पाण्याचा निचरा
केला.

दुसरीकडे मुंबईत पाऊस कोसळत असतानाच सखल भागात पाणी साचल्याने वांद्रे येथील नॅशनल कॉलेज आणि एस.व्ही. रोड येथील बेस्ट बसची वाहतूक वळविण्यात आली होती, अशी माहिती बेस्ट प्रशासनाकडून देण्यात आली. रविवारी सकाळी ६ च्या सुमारास पवई तलाव ओव्हरफ्लो झाला आहे.

Web Title: waterlogged in Wadala, Sion, Kurla, Chembur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.