मुंबई : पालिकेचे पाणी चोरून विकणाऱ्या वडाळा येथील २० ते २५ ठिकाणी पोलीस आणि पालिका अधिकाऱ्यांनी मंगळवारी छापे मारले. यात पोलिसांनी पाणीउपसा करणाऱ्या अनेक मोटारी जप्त करत ४ पाणीमाफियांवर गुन्हे दाखल केले आहेत. त्यांना अटक करण्यात आली आहे. या छाप्याची माहिती मिळताच अनेकांनी पळ काढला. वडाळ्याच्या कोकरी आगार परिसरात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई आहे. त्यामुळे पाणीमाफिया मुख्य जलवाहिन्या फोडून हजारो लीटर पाण्याची चोरी करत आहेत. हेच पाणी जास्त पैसे आकारून कारखानदार आणि हॉटेल मालकांना विकले जात आहे. वडाळा आणि अॅण्टॉप हिल येथील म्हाडा कॉलनी परिसरात हा धंदा तेजीत आहे. रहिवाशांचे पाणी चोरून ते इतरत्र विकत असल्याने परिसरात राहणाऱ्या रहिवाशांना पाण्यासाठी मोठ्या प्रमाणात वणवण भटकावे लागत आहे. गेल्या दोन महिन्यांपासून पाणीमाफियांचा हा धंदा येथे सुरू होता. अखेर ही माहिती पालिका आधिकारी आणि वडाळा ट्रक टर्मिनल पोलिसांना मिळताच त्यांना मंगळवारी पहाटे ६च्या सुमारास या परिसरात छापे घातले. या वेळी अनेक माफिया मोटारी लावून पाण्याचा उपसा करत असल्याचे पोलीस आणि पालिका अधिकाऱ्यांना समजले. त्यानुसार तत्काळ या ठिकाणी कारवाई करण्यात आली. मात्र काही क्षणांत ही माहिती संपूर्ण परिसरात पसरताच पाणीमाफियांनी परिसरातून पळ काढला. दरम्यान, वडाळा ट्रक टर्मिनल पोलिसांनी पाठलाग करत ४ माफियांना अटक केली. तसेच या परिसरातून पोलिसांनी पाणीउपसा करणाऱ्या २२ मोटारी जप्त केल्या असून, या प्रकरणी आणखी काही माफियांना अटक होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. (प्रतिनिधी)
वडाळ्यात पाणीमाफिया गजाआड
By admin | Published: May 11, 2016 2:32 AM