Join us

कच्चे कलिंगड केमिकल वापरून लाल केले जातात; असं ओळखा कलिंगडमधील 'केमिकल लोचा'

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2023 12:06 PM

उन्हाळ्यात चवीला गोड असणारे आणि पोटाला थंडावा देणाऱ्या कलिंगडाची मागणी प्रचंड असते.

मुंबई- उन्हाळ्यात चवीला गोड असणारे आणि पोटाला थंडावा देणाऱ्या कलिंगडाची मागणी प्रचंड असते. या मागणीचा फायदा घेत कच्चे कलिंगड केमिकल वापरून लाल केले जाते. आणि ते बाजारात सर्रास विकले जाते. त्यामुळे असे कलिंगड आरोग्यासाठी हानिकारक असतात. तेव्हा लोकांनीही केमिकलचा लोचा ओळखता यायला हवा.

उन्हाळ्यात कलिंगड उपयोगी 

उन्हाळ्यात उष्णतेचा परिणाम शरीरावर होत असतो. तेव्हा शरीर डिहायड्रेशनपासून वाचविण्यासाठी केमिकलयुक्त थंड पेयांपेक्षा लोकांना कलिंगड खाणे जास्त आवडते. शिवाय कलिंगडमध्ये ९२ टक्के पाणी असल्याने ते आरोग्यासाठी फायदेशीर असते.

३० रुपये किलो 

बाजारात अद्याप हवी तशी कलिंगडाची आवक झालेली नाही. सध्या ३० रुपये किलोपासून ८० रुपयांपर्यंत  मिळत आहे. लहान कलिंगड ३० तर मध्यम आकाराचे ५० रुपयांत विकले जाते. 

केमिकल वापरून केले जाते लाल 

उन्हाळा वाढल्यामुळे कलिंगडाची मागणी जास्त आहे. अशावेळी मागणीचा फायदा घेत बाजारात केमिकल वापरून लाल केलेले कलिंगड विकले जातात. स्टेरॉईड इंजेक्शन वापरून ते लाल केले जाते.

अन्न व औषध प्रशासनाचे लक्ष 

लाल कलिंगड मिळवण्यासाठी ग्राहकांची झुंबड असते. अशा गर्दीत केमिकल वापरून लाल केलेले कलिंगड विकले जातात आणि ग्राहकांची फसवणूक होते. त्यावर अन्न व औषध प्रशासन अशा कलिंगडाचे नमुने घेऊन तपासणी करतात.

केमिकल वापरलेले कलिंगड कसे ओळखाल?

केमिकल वापरलेल्या कलिंगडामध्ये हिरवा रंग दिसत नाही. त्याचा देठही हिरवा असतो. आकार वेडावाकडा मध्येच दबलेला असतो. खाण्यापूर्वी दहा ते पंधरा मिनिटे पाण्यात ठेवावे.

बाजारात अथवा फळ विक्रेत्याकडे केमिकल वापरून लाल केलेली कलिंगड विकले जात असल्याचे निदर्शनास आल्यास दक्ष नागरिक म्हणून आपणही हेल्पलाइन किंवा अन्न व औषध प्रशासन कार्यालयाच्या निदर्शनास आणून देऊ शकता.- शशिकांत केंकरे, सहआयुक्त, अन्न व औषध प्रशासन

टॅग्स :फळेआरोग्य