प्लॅस्टिकबंदीमुळे पाणी तुंबण्याचे प्रमाण कमी; पालिकेची हायकोर्टाला माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2018 06:08 AM2018-07-19T06:08:26+5:302018-07-19T06:08:43+5:30
राज्य सरकारने लागू केलेल्या प्लॅस्टिकबंदीमुळे यंदा पावसाळ्यात पाणी कमी प्रमाणात तुंबले, अशी माहिती मुंबई महापालिकेने उच्च न्यायालयाला बुधवारी दिली.
मुंबई : राज्य सरकारने लागू केलेल्या प्लॅस्टिकबंदीमुळे यंदा पावसाळ्यात पाणी कमी प्रमाणात तुंबले, अशी माहिती मुंबई महापालिकेने उच्च न्यायालयाला बुधवारी दिली. गेल्या वर्षी बॉम्बे हॉस्पिटलचे प्रसिद्ध डॉक्टर दीपक अमरापूरकर यांचा मृत्यू मॅनहोलमध्ये पडून झाल्याने शहरातील प्रत्येक मॅनहोलवर संरक्षक जाळ्या बसवाव्यात, यासाठी फेडरेशन आॅफ रिटेल ट्रेडर्स वेल्फेअर असोसिएशनने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.
या याचिकेवरील सुनावणीत महापालिकेच्या वतीने ज्येष्ठ वकील अनिल साखरे यांनी आतापर्यंत मॅनहोलवर संरक्षक जाळ्या टाकण्याचे काम ८५ टक्के पूर्ण झाले असून केवळ १५ टक्के काम अपूर्ण असल्याची माहिती न्या. रणजीत मोरे व न्या. अनुजा प्रभुदेसाई यांच्या खंडपीठाला दिली.
‘नव्याने ८३९ मॅनहोल आढळले असून त्यापैकी ७१० मॅनहोलना संरक्षक जाळ्या बसविल्या आहेत. उरलेल्या मॅनहोलवर लवकरच जाळ्या बसविण्यात येतील,’ अशी माहिती महापालिकेने उच्च न्यायालयाला दिली. गेल्या सुनावणीत महापालिकेने १४०० मॅनहोलना संरक्षक जाळी बसविल्याची माहिती न्यायालयाला दिली होती.