Join us

पाणथळ जागांचे अधिवास नष्ट झाले; सर्व पक्षी तुलनेने सुरक्षित ठिकाणी वळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2021 4:05 AM

मुंबई : ठाणे खाडीत पाणथळ अधिवासातील पक्षांची विपुलपणे संख्या वाढण्याचे कारण म्हणजे मुंबई आणि उरणमध्ये असलेल्या पाणथळ जागांचे ...

मुंबई : ठाणे खाडीत पाणथळ अधिवासातील पक्षांची विपुलपणे संख्या वाढण्याचे कारण म्हणजे मुंबई आणि उरणमध्ये असलेल्या पाणथळ जागांचे अधिवास हे नष्ट झाले आहेत. त्यामुळे या ठिकाणचे सर्व पक्षी हे पर्यायाने तुलनेने सुरक्षित अशा ठाणे खाडीकडे वळले आहेत, असे बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

खाडीत सोडण्यात येणारे सांडपाणी, शुद्धीकरण कारखाना (रिफायनरीज) आणि ऊर्जा प्रकल्पांतून बाहेर पडणारे कोमट पाणी (पोषक मूलद्रव्यांनी युक्त समृद्ध वनस्पती आणि जीवजंतूसह) यांच्या मिश्रणामुळे मुंबई शहर वगळून उर्वरित मुंबई महानगर हे संपूर्ण क्षेत्र हे अन्न मिळविण्यासाठी योग्य अशा अधिवास स्वरूपात विकसित झाले आहे. सृष्टी कन्झर्व्हेशन फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेच्या अभ्यासपूर्ण प्राथमिक अहवालात हे नमूद करण्यात आले आहे. रोहित पक्षी आणि स्थलांतर करणारे पाणथळ अधिवासातील पक्षी यांना या संकुचित होत चाललेल्या नदी/ नाल्यांचा फायदा होताना दिसत आहे. कारण त्यांच्या संख्येतील वाढ ही या भागात वाढत असणाऱ्या गाळयुक्त प्रदेश आणि पसरत चाललेल्या कांदळवनांच्या प्रमाणात होताना दिसत आहे.

नव्याने निर्माण झालेली जमीन ही कांदळवनांनी/ खारफुटी वनस्पतींनी भरून गेली. त्याचबरोबर जर सागरी लाटांच्या त्रिकोनात्मक परिणामामध्ये पावसाळ्याशिवाय इतर ऋतूत घट झाली तर सुपीक गाळयुक्त दलदलींचे क्षेत्र हे एकदम कडक आणि ओसाड अशा जमिनीत रूपांतरित होईल. यामुळे या भागातील रोहित पक्षी हे कायमचे हा त्यांचा अधिवास सोडून निघून जातील.

- डॉ. दीपक आपटे, कार्यकारी संचालक, सृष्टी कन्झर्व्हेशन फाउंडेशन

- समुद्र पातळीतील संभाव्य वाढीमुळे सारस पक्षी (फ्लेमिंगो) कायमचे दूर जाऊ शकतात.

- मुंबई आणि ठाणे खाडीमध्ये समुद्राच्या पूर्वेला पृष्ठभागावर पसरलेल्या पाण्याच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात घट दिसून आली आहे.

- १९९० साली जवळपास ४०० चौ. कि.मी. पसरलेले पाणी क्षेत्रफळ हे २०१९ पर्यंत ३५० चौ. कि.मी. पेक्षा कमी झाले.

- १९९५ ते २००५ दरम्यान सारस पक्ष्यांची सरासरी संख्या हळूहळू काही हजारांवरून २० हजार एवढी वाढली.

- बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीने विविध माध्यमांद्वारे प्रसारित केलेल्या माहितीनुसार, ही संख्या २०१९ मध्ये एकदम वाढून १ लाख २० हजार झाली.