पाणथळींची होतेय घुसमट !

By admin | Published: February 2, 2015 03:08 AM2015-02-02T03:08:46+5:302015-02-02T03:08:46+5:30

मुंबई महानगर प्रदेशातील जलप्रदूषण, मोठ्या प्रमाणावर होत असलेली झाडांची कत्तल आणि खारफुटींची तोड, अशा विविध कारणांमुळे पाणथळ जागा नष्ट होत आहेत

Watery intrusion! | पाणथळींची होतेय घुसमट !

पाणथळींची होतेय घुसमट !

Next

सचिन लुंगसे,  मुंबई
मुंबई महानगर प्रदेशातील जलप्रदूषण, मोठ्या प्रमाणावर होत असलेली झाडांची कत्तल आणि खारफुटींची तोड, अशा विविध कारणांमुळे पाणथळ जागा नष्ट होत आहेत. समुद्रकिनाऱ्यासह खाडीलगतच्या पाणथळ जागांमध्ये दिवसेंदिवस वाढत असलेले प्रदूषण यास मुख्यत: कारणीभूत असून, याकडे केल्या जाणाऱ्या दुर्लक्षामुळे पाणथळ जागांची घुसमट दिवसेंदिवस वाढतच चालली आहे.
मुंबई महानगर प्रदेशातील बेसुमार नागरिकरणाचा फटका पाणथळींना बसू लागला आहे. परिणामी स्थलांतरित पक्ष्यांच्या संख्येत घट होऊ लागली असून, पाणथळ जमिनी नष्ट झाल्याने पाणपक्ष्यांना मोठा धोका निर्माण झाला आहे. शिवडी येथील खाडीत मोठ्या प्रमाणावर जलप्रदूषण झाले असून, येथील स्थलांतरित फ्लेमिंगोंना याचा फटका बसत असल्याचे पक्षीमित्रांचे म्हणणे आहे. पवई तलाव, मिठी नदी, माहीमची खाडी, वर्सोवा, मुंब्रा, दिवा येथील काही पाणथळी भराव टाकून विकासकामांसाठी नष्ट करण्यात आल्या आहेत. भांडुप आणि मुलुंड येथील पाणथळी जमिनी मात्र आपले अस्तित्व टिकवून आहेत. वांद्रे-कुर्ला संकुलातील काही पाणथळ जागा विकासकामांदरम्यान नष्ट झाल्या आहेत. शिवडी येथील फ्लोमिंगोंचा अधिवास जलप्रदूषणामुळे धोक्यात आला आहे. दक्षिण मुंबईतील वृक्षतोडीमुळे येथील स्थानिक पक्ष्यांनाही नव्या वातावरणाशी जुळवून घेणे कठीण झाले आहे.
पाण्याचे नैसर्गिकरीत्या शुद्धीकरण करणे, पाण्याची गुणवत्ता शुद्ध राखणे, पर्यावरणाचे संतुलन राखणे, मानवनिर्मित मलनिस्सारण करणे असे फायदे पाणथळ जागांपासून मिळतात. जमिनीची सुपिकता वाढविणे, नैसर्गिकरीत्या शेतजमिनीतील सेंद्रिय घटकांचे संतुलन राखणे अशी मदत पाणथळ जागा करतात. परंतु अतिवापरामुळे पाणथळ जागा धोक्यात आल्या आहेत. काही ठिकाणी तर चक्क पाणथळ जागांवर भराव टाकून त्या अनधिकृत निवासासाठी वापरल्या जात आहेत. मुळात पाणथळ जागा कोणत्याही प्रशासनाच्या अखत्यारीत येत नाहीत. याचे व्यवस्थापन ही प्रामुख्याने पर्यावरण व वन मंत्रालयाची जबाबदारी आहे. औद्योगिक विकास देशात मोठ्या वेगाने होत आहे. प्रदूषणाला प्रतिबंध घालून सातत्यपूर्ण विकास करणे, पर्यावरणाचे जतन करणे या दृष्टीने पर्यावरणीय व्यवस्थापन ही काळाची गरज आहे.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे वंचक प्रजातीचे बगळे, फ्लेमिंगो, पळस मैना यासारखे पक्षी हे जलचर, कीटक आणि मासे या खाद्यांवर अवलंबून असतात. मात्र गेल्या काही वर्षांपासून खाड्या आणि गोड्या पाण्याचे जलाशय प्रदूषित होत आहेत.

Web Title: Watery intrusion!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.