मुंबई : टीआरपी घोटाळाप्रकरणी बुधवारी ठाण्यातून आणखी एकाला अटक करण्यात आली. आशिष अबिदुर चौधरी (५०) असे त्याचे नाव असून या प्रकरणातील ही अकरावी अटक आहे. त्याच्या चौकशीतून कृत्रिमरीत्या टीआरपी वाढविण्यात वॉव टीव्हीचाही सहभाग असल्याचे समोर आले.यापूर्वी गुन्हे शाखेने या प्रकरणी ठाण्यातून अभिषेक कोलवडे याला अटक केली. त्याच्या चाैकशीत त्याने ग्राहकांना टीव्ही बघायला भाग पाडून टीआरपी वाढविण्यासाठी रिपब्लिक आणि न्यूज नेशन या वृत्तवाहिन्यांकडून पैसे स्वीकारल्याचे कबूल केले. विविध नावांनी वावरणाऱ्या अभिषेककडे वाहिन्यांनी पुरविलेले पैसे साथीदारांमार्फत ग्राहकांना पोहाेचविण्याची जबाबदारी होती. त्याच्याच चौकशीतून चौधरीचे नाव समोर आल्याचे समजते. चौधरी हा ठाणे पश्चिमेकडील हिरानंदानी मिडोज परिसरात राहताे.आतापर्यंत सीआययूने अटक केलेल्या आरोपींच्या चौकशीत बॉक्स सिनेमा, फक्त मराठी, रिपब्लिक, न्यूज नेशन यांची नावे समोर आली. चाैधरीच्या अटकेनंतर आता त्यात वॉव टीव्हीचीही भर पडली आहे.
चॅनेल्सच्या टीआरपीसाठी पुरवायचा पैसेक्रिस्टल ब्रॉडकास्ट प्रायव्हेट लिमिटेडचे भागीदार आशिष अभिदुर चौधरीने न्यूज नेशन टीव्ही, वॉव म्युझिक आणि रिपब्लिक भारत या हिंदी वाहिन्यांची टीआरपी वाढविण्याकरिता २०१७ ते जुलै २०२० या कालावधीत पैसे दिल्याचे अटक आरोपी अभिषेक कोलवडे उर्फ अजित उर्फ अमित उर्फ महाडिक याच्या चौकशीत समाेर आले. त्याच्या क्रिस्टल ब्रॉडकास्टमार्फत ही रक्कम अभिषेकच्या मॅक्स मीडियामध्ये आली. त्यानुसार बुधवारी सकाळी चौधरी स्वतः हजर होताच त्याच्याकडे याबाबत अधिक तपास करण्यात आला. प्राथमिक तपासात त्याचा सहभाग स्पष्ट होताच त्याला अटक करण्यात आली. त्याच्याकड़ून १ लाख ५०० रुपयांसह दोन सोन्याच्या अंगठ्या जप्त करण्यात आल्या.. अभिषेक, आशिषला पोलीस कोठडीअभिषेक आणि आशिषला २ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनाविण्यात आली आहे. दोघांची समोरासमोर चौकशी करण्यात येईल. तर रामजी वर्मा आणि दिनेशकुमार विश्वकर्मा यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली.