पाचू बंदरात दुसऱ्या दिवशीही लाटांची धडक
By admin | Published: June 13, 2014 11:10 PM2014-06-13T23:10:39+5:302014-06-13T23:10:39+5:30
समुद्राच्या भरतीचा तुफानी तडाखा वसई परिसरातील किनाऱ्यावर शुक्रवारीही कायम होता
नायगांव : समुद्राच्या भरतीचा तुफानी तडाखा वसई परिसरातील किनाऱ्यावर शुक्रवारीही कायम होता. बुधवारपासून अर्नाळा, मर्सिस, रानगांवसह सुरूच्या परिसरास झोडपून काढणाऱ्या लाटांनी पाचू बंदर भागातील नागरी वस्तीपर्यंत धडक दिली.
दुपारी १.३० च्या सुमारास अचानक वाढलेल्या भरतीचे पाणी लाटांच्या रूपात धोक्याच्या पातळीपर्यंत पोहोचल्याने स्थानिक चिंतेत होते. अजून काही दिवस भरती राहणार असल्याने या भागातील किनाऱ्यावरील घरांना धोका कायम आहे.
यावेळी ४ ते ४.५ मिटरच्या लाटा उसळल्याने व वेळेप्रमाणे त्याची तीव्रता वाढत असल्याचे दिसून आले. यापूर्वी वसई किनारपट्टीला नुकसानकारक ठरलेल्या उधाणामुळे अर्नाळा किल्ला सर्वात जास्त प्रभावीत झालेला आहे. या भागात धूप प्रतिबंधक किनाऱ्याची आवश्यकता भासत आहे. अर्नाळा भागात ही स्थिती असताना पाचू बंदर भागात बंधारे असूनही भरतीची तीव्रता मोठ्या प्रमाणात जाणवत होती. (वार्ताहर)