‘गेट वे’जवळील समुद्रात आल्या नोटांच्या लाटा
By admin | Published: August 13, 2015 03:09 AM2015-08-13T03:09:54+5:302015-08-13T03:09:54+5:30
दररोज पर्यटकांची वर्दळ असणारे गेट वे आॅफ इंडियावर गेले मंगळवारी जरा जास्तच गर्दी होती. समुद्राच्या लाटांमधून नोटा वाहत आल्याने त्या उचलण्यासाठी ही गर्दी झाली होती.
मुंबई : दररोज पर्यटकांची वर्दळ असणारे गेट वे आॅफ इंडियावर गेले मंगळवारी जरा जास्तच गर्दी होती. समुद्राच्या लाटांमधून नोटा वाहत आल्याने त्या उचलण्यासाठी ही गर्दी झाली होती. एका विदेशी पर्यटकाने हजाराच्या नोटा समुद्रात फेकून स्थानिकांना ते गोळा करण्याचे आव्हान दिल्याचे सांगितले जात आहे.
गेट वे आॅफ इंडियाच्या किनारी मंगळवारी दुपारी एक परदेशी पर्यटक फिरत होता. गेट वे ते रेडिओ क्लबपर्यंतच्या समुद्र किनाऱ्यावर या विदेशी पर्यटकाने मंगळवारी दुपारी हजार रुपयांच्या नोटांचे बंडल फेकले. स्थानिक मच्छिमार आणि नागरिकांनी पाण्यात उड्या मारत जास्तीत जास्त नोटा मिळविण्याचा प्रयत्न केला. काहींनी तरंगणाऱ्या नोटा आणि गोळा करणाऱ्यांचे मोबाईवर चित्रण केले. काही वेळातच ही बातमी पोलिसांपर्यंत पोहोचली. ते त्याठिकाणी पोहोचेपर्यंत नोटा गोळा करून लोक निघून गेले होेते. कुलाबा पोलिसांनी एकाला ताब्यात घेऊन विचारणा केली असता, त्याने सर्व घटनाक्रम सांगितला. ठोस माहिती न मिळाल्यामुळे चौकशीनंतर त्याला सोडण्यात आले. नोटा गोळा करणाऱ्यांपैकी एकही जण त्याबाबत माहिती देण्यासाठी पुढे आलेला नाही. या नोटा खऱ्या की खोट्या हेही अद्याप स्पष्ट झालेले नाही. तर परदेशी नागरिक कोण होता व त्याचा यामागे कोणता उद्देश होता, याचा शोध सुरु असल्याचे मुंबई पोलीस दलाचे प्रवक्ते धनंजय कुलकर्णी यांनी सांगितले.