मुंबई : दैनंदिन रुग्ण वाढीचे प्रमाण एक टक्क्याहून कमी असल्यास महामारीचा प्रसार संपण्याच्या मार्गावर आहे, असे मानले जाते. मुंबईत बाधित रुग्णांची सरासरी दैनंदिन वाढ १.३५% आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रसार पूर्णपणे आटोक्यात येण्याच्या मार्गावर आहे, असा दावा पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी केला.मुंबईत ९४,८६३ कोरोनाबाधित आढळले आहेत. यापैकी ७०% कोरोनामुक्त झाले असून सध्या २१,४५० सक्रिय रुग्ण आहेत. हॉटस्पॉट ठरलेल्या वरळी, धारावी, चेंबूर, वांद्रे येथे दैनंदिन सरासरी रुग्ण वाढीचा दर ०.८ ते १.३ टक्के आहे. तर बोरवली, दहिसर, मुलुंड या विभागांमध्ये रुग्ण वाढीचा दैनंदिन दर दोन ते अडीच टक्के आहे.यापूर्वी एका बाधित रूग्णामागे नऊ जणांना संसर्ग होत होता. आता हे प्रमाण एक बाधित एकाला संसर्ग असे आहे. दैनंदिन रुग्ण वाढीचे प्रमाण एक टक्क्याहून खाली आल्यास कोरोनाचा प्रसार आटोक्यात आला, असे मानले जाते. मुंबई विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विभागाचे प्राध्यापक नीरज हातेकर यांच्या अहवालाचा दाखला देत मुंबईतही कोरोनाचा प्रसार नियंत्रणात येत असल्याचा दावा आयुक्तांनी केला.
CoronaVirus News : मुंबईत कोरोना पूर्णपणे नियंत्रणात येण्याच्या मार्गावर, पालिका आयुक्त चहल यांचा दावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2020 4:55 AM