दादर कोरोनामुक्तीच्या मार्गावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:07 AM2021-01-16T04:07:31+5:302021-01-16T04:07:31+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई - मुंबईचे मध्यवर्ती ठिकाण असल्याने गजबजलेल्या दादर विभागात कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी महापालिकेचे अनेक प्रयत्न सुरू ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई - मुंबईचे मध्यवर्ती ठिकाण असल्याने गजबजलेल्या दादर विभागात कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी महापालिकेचे अनेक प्रयत्न सुरू आहेत. यासाठी पेट्रोलपंप, बेकरी, ज्वेलरी आदी दुकानातील कर्मचाऱ्यांची चाचणी करण्यात येत आहे. यामुळे आता बाधित रुग्ण सापडण्याचे प्रमाण अत्यल्प असून, आता केवळ ९६ सक्रिय रुग्ण आहेत. त्यामुळे धारावीपाठोपाठ आता दादर विभागही कोरोनामुक्तीच्या मार्गावर आहे.
दादर, माहीम, धारावी या जी उत्तर विभागातील भागांमध्ये कोरोनाचा प्रसार नियंत्रणात आणण्यात पालिकेला यश आले आहे. मात्र, मुख्य बाजारपेठ असल्यामुळे दादर परिसर तर आशिया खंडातील मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावी परिसरात लोकांची वर्दळ अधिक प्रमाणात असते. त्यामुळे सावधगिरीची उपाययोजना म्हणून पालिकेने या विभागांमध्ये कोरोना चाचणी सुरू ठेवली आहे. यासाठी विशेष चाचणी शिबिरेही आयोजित करण्यात आली आहेत.
त्याचे चांगले परिणाम आता दिसून येत असून, गुरुवारी दादरमध्ये तीन बाधित रुग्ण आढळले तर धारावीत सात आणि माहीममध्ये आठ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. धारावी परिसरातील पालिकेच्या उपायोजनांनी जागतिक स्तरावर कौतुक मिळवले आहे. धारावी पॅटर्नची अंमलबजावणी देशातील अन्य ठिकाणीही केली जात आहे. त्यानंतर आता दादर विभागानेही कोरोनामुक्तीच्या मार्गावर पाऊल ठेवले आहे.
परिसर.. एकूण रुग्ण....सक्रिय....डिस्चार्ज
धारावी...३८७७...१६....३५४९
दादर....४८६१..९६....४५९२
माहीम....४६९२...१२७...४४२१