महापारेषणच्या नवीन पदांच्या भरतीचा मार्ग झाला मोकळा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2021 06:29 AM2021-07-03T06:29:22+5:302021-07-03T06:30:17+5:30
कृष्णा भोयर यांची माहिती; २००७ पासून सुरू होता पाठपुरावा
मुंबई : महापारेषणचा सुधारित आकृतिबंध लागू झाला असून, नवीन हजारो रिक्त पदे भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे, अशी माहिती महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनचे सरचिटणीस कृष्णा भोयर यांनी दिली. आकृतिबंध मंजूर होत लागू करण्याची प्रकिया सुरू करण्यात आल्यामुळे लवकरच प्रलंबित ४ हजार ५०० तंत्रज्ञ-४ यांच्या पदोन्नतीचा मार्ग मोकळा झाला असून ४ हजारांवर रिक्त असलेले तंत्रज्ञ - ४ प्रवर्गातील पदा भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे, असेही भोयर यांनी नमूद केले.
महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या विभाजनानंतर तयार झालेल्या महापारेषण कंपनीतील वर्ग - १ व ४ प्रवर्गातील आकृतिबंधामध्ये पदोन्नतीमध्ये तयार झालेली असमानता दूर करण्यासाठी महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन संघटनेच्या वतीने २००७ पासून पाठपुरावा करण्यात आला होता. २०१७ मध्ये सुधारित आकृतिबंध लागू करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. महापारेषण प्रशासनाने त्रयस्थ के. पी. बक्षी समितीचे गठन केले. बक्षी समितीचा अहवाल महापारेषण कंपनी व्यवस्थापनास सादर करण्यात आला होता. आकृतिबंध लागू करावा या मागणीसाठी प्रकाशगंगा मुख्य कार्यालयासमोर वर्कर्स फेडरेशन सघंटनेच्या वतीने बेमुदत आंदोलन करण्यात आल्यानंतर प्रधान सचिव ऊर्जा यांच्यासमवेत संघटनेचे पदाधिकारी याची बैठक झाली होती
आकृतिबंधास मान्यता
ऊर्जासचिव यांनी तेव्हा दिलेला महापारेषण कंपनी संचालक मंडळाची मान्यता घेऊन राज्य सरकारच्या ऊर्जा विभागास मान्यतेसाठी पूर्ण सुधारणेसह एप्रिल-२०२१ मध्ये हा विषय सादर केला होता. सूत्रधारी कंपनी संचालक मडंळाच्या झालेल्या बैठकीत चर्चा होऊन आकृतिबंधास मान्यता प्रदान करण्यात आली. सूत्रधारी कंपनीची मान्यता मिळाल्यानंतर महापारेषण कंपनी संचालक मंडळाची मान्यता घेण्यात आली असून, आकृतिबंध लागू करण्यात आला.