एनआयएची विशेष न्यायालयाला माहिती
वाझे तपासाला सहकार्य करत नाही
एनआयएची विशेष न्यायालयाला माहिती
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे तपासाला सहकार्य करत नाही. त्यामुळे पुढील तपास करू शकत नाही, अशी माहिती एनआयएने विशेष न्यायालयाला शुक्रवारी दिली.
प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर काही दिवसांपूर्वी जिलेटीनच्या कांड्यांनी भरलेली स्कॉर्पिओ कार आढळली. तसेच ठाण्याचे व्यावसायिक मनसुख हिरेन यांचा गूढ मृत्यू झाल्याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक सचिन वाझेला एनआयएने अटक केली.
शुक्रवारच्या सुनावणीत एनआयएने विशेष न्यायालयाला सांगितले की, वाझेची चौकशी सुरू असताना त्याच्या वकिलांना ते दिसतील अशा अंतरावर उभे राहण्याची परवानगी दिली आहे. वाझेच्या वकिलांना चौकशीत काय प्रश्न विचारण्यात येत आहेत आणि काय उत्तरे दिली, हे ऐकण्याची परवानगी नाही. त्यामुळे त्यांना काही दूर अंतरावर उभे राहण्याची परवानगी देण्यात आली आहे, पण तरीही वाझेचे वकील उपस्थित राहत नाहीत.
तर दुसरीकडे वाझेच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले की, एक वकील एनआयए कार्यालयाच्या बाजूला असलेल्या हॉटेलमध्ये एक रात्र राहिला. सचिन वाझेची चौकशी सुरू करण्यात आली की बोलवावे, असे सांगूनही एनआयए अधिकाऱ्यांनी त्यांना बोलावले नाही.
दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने एनआयएचा अर्ज फेटाळला. या अर्जाद्वारे एनआयएने न्यायालयाला विनंती केली होती की, सचिन वाझेच्या वकिलांना चौकशीदरम्यान उपस्थित राहण्याचे निर्देश द्यावेत. जेणेकरून वाझे सहकार्य करतील, तर दुसरीकडे न्यायालयाने वाझेचा अर्ज फेटाळला. तपासादरम्यान वकिलांशी संवाद साधण्याची मुभा वाझेने मागितली होती.