वाझे कशासाठी सीम कार्ड वापरणार याची कल्पना नव्हती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:06 AM2021-04-01T04:06:46+5:302021-04-01T04:06:46+5:30
ठक्करचा एनआयएला जबाब लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मैत्रीच्या नात्याने आपण सचिन वाझे व नरेश गोर यांना ...
ठक्करचा एनआयएला जबाब
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मैत्रीच्या नात्याने आपण सचिन वाझे व नरेश गोर यांना मोबाईलचे सीम कार्ड दिले होते, त्याचा वापर ते कशासाठी करणार होते, याची आपल्याला कल्पना नव्हती, अशी माहिती अहमदाबाद येथील किशोर ठक्करने राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या अधिकाऱ्यांना (एनआरआय) दिल्याचे समजते.
एटीएसकडून मंगळवारी ठक्करला ताब्यात घेतले असून, त्याच्याकडे चौकशी करण्यात येत आहे. मनसुख हिरेन यांच्या हत्येशी आपला काहीही संबंध नसून, त्यांना आपण ओळखतही नसल्याचा दावा त्याने केला. ठक्करने वाझे व विनायक शिंदे यांच्याबद्दल आपल्याला फारशी माहिती नाही, क्रिकेट बुकी नरेश गोर आपल्या परिचयातील असल्याने त्याच्या माध्यमातून त्या दोघांची ओळख झाली, त्याच्या मागणीवरून त्यांना सीम कार्ड पाठविले, मात्र ते त्याचा वापर गुन्ह्यासाठी करतील याची कल्पना नव्हती. कार्ड दिल्यानंतर आपण त्यांच्या संपर्कातही नव्हतो, असे चाैकशीत सांगितल्याचे समजते.
हिरेन हत्या प्रकरणाचा उलगडा एटीएसने केल्यानंतर त्याचे एक पथक मागच्या आठवड्यात अहमदाबादला गेले होते. ठक्करला ट्रांझिस्ट रिमांडवर ताब्यात घेऊन मंगळवारी ते मुंबईत परतले. या गुन्ह्याचा तपास त्यांच्याकडे वर्ग केल्याने त्याला त्यांच्या ताब्यात देण्यात आले.
* काझी, ओव्हाळची चौकशी सुरूच
जिलेटिनच्या कांड्या सापडलेल्या स्फाेटक कारप्रकरणी सचिन वाझेचे सीयूआयमधील तत्कालीन सहकारी सहायक निरीक्षक रियजुद्दीन काझी व प्रशांत ओव्हाळ यांची एनआयएकडून झाडाझडती सुरूच आहे. बुधवारी त्यांच्याकडे चार तास चौकशी करण्यात आली. त्यांना दररोज कार्यालयात बोलावून वाझेबद्दल आणि स्फोटक कार व हिरेन हत्या प्रकरणातील त्यांच्या सहभागाबद्दल माहिती घेण्यात येत आहे.