वाझेचे बनावट नावाने ‘ट्रायडन्ट’मध्ये वास्तव्य!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:07 AM2021-03-23T04:07:17+5:302021-03-23T04:07:17+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : स्फोटक कार प्रकरणी एनआयएच्या अटकेत असलेल्या सचिन वाझेकडील तपासातून अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : स्फोटक कार प्रकरणी एनआयएच्या अटकेत असलेल्या सचिन वाझेकडील तपासातून अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या. १६ ते २० फेब्रुवारीदरम्यान तो हॉटेल ट्रायडन्टमध्ये बनावट नावाने वास्तव्याला होता. या काळात त्याने अनेकांशी भेट घेतल्याचे समजते. तपास अधिकाऱ्यांनी हॉटेल व तो उतरलेल्या रूमच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज व हॉटेलमधील नोंदी ताब्यात घेतल्या आहेत.
सचिन वाझे याने एस.एस. गावडे या नावाच्या आधारकार्डचा हवाला देऊन हॉटेलात मुक्काम केला होता. त्या आधारकार्डवर त्याचा फोटो होता. त्यामुळे त्याने बनावट आधारकार्डही बनविली असल्याचे उघड झाल्याचे सांगण्यात आले. वाझे १६ तारखेला एका इनोव्हातून हॉटेलमध्ये आला होता. त्याच्याकडे त्यावेळी दोन बॅगा होत्या. त्यामध्ये रोकडसह अन्य काही कागदपत्रे असावीत असा अधिकाऱ्यांना संशय आहे. त्याचप्रमाणे २० तारखेला त्याने रूम सोडल्यानंतर दुसऱ्या एका कारमधून निघून गेल्याची माहिती आहे. त्याने खोटे नाव का वापरले, त्याने अँटिलियाच्या परिसरात जिलेटीनच्या कांड्या असलेली स्काॅर्पिओ ठेवण्याचा कट रचला का, चार दिवसांच्या वास्तव्यात त्याने काय केले, कोणाशी भेटीगाठी घेतल्या, याबाबतची माहिती घेतली जात असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
* दिल्लीहून अधिकारी येणार
एटीएसने मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा छडा लावण्यात यश मिळविले. त्यामध्ये वाझेचा ताबा मागितला आहे. त्यामुळे एनआयए स्फोटक कार प्रकरणाचा तपास जलदगतीने पूर्ण करणे आणि हत्येचा गुन्हा घेण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. त्याबाबत तपास अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी दिल्लीतील वरिष्ठ अधिकाऱ्याचे पथक मुंबईत येणार असल्याचे सांगण्यात आले.