लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कारमायल रोडवरील कारमध्ये ठेवण्यात आलेली स्फोटके आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणातील आरोपी, बडतर्फ एपीआय सचिन वाझे याची सक्तवसुली संचालनालय (ईडी)कडून चौकशी सुरू आहे. तळोजा कारागृहात असलेला वाझे आणि अटकेत असलेला संजीव पालांडे व कुंदन शिंदे याची सोमवारी समोरासमोर बसवून चौकशी करण्यात आली.
तळोजा कारागृहात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या चौकशीचे सत्र तूर्तास थांबविण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. मुंबईतील बारमालकांकडून वसूल केलेले ४.७० कोटी डिसेंबर ते फेब्रुवारी या कालावधीत तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांचे खासगी सचिव संजीव पालांडे व स्विय सहायक कुंदन शिंदे यांच्याकडे दिल्याची कबुली वाझेने दिली होती. मात्र, दोघेजण त्याचा इन्कार करीत होते, त्याबाबत न्यायालयाच्या परवानगीने शनिवारपासून वाझेचा जबाब नोंदविला जात आहे.
ईडीचे अधिकारी सोमवारी सकाळी पालांडे व शिंदेला घेऊन तळोजा कारागृहामध्ये गेले. त्यांनी वाझेला दोघांसमोर स्वतंत्रपणे बसवून त्यांच्याकडे विचारणा केली. मंत्र्यांच्या बंगल्यातील भेटीची तपशीलवार माहिती जाणून घेण्यात आल्याचे समजते. वाझेकडे गेल्या ३ दिवसांत एकूण १५ तास चौकशी करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. त्याबाबतचा अहवाल न्यायालयासमोर ठेवून पुढील कार्यवाही केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.