मुकेश अंबानी धमकी प्रकरण : देवेंद्र फडणवीस यांचे आरोप फेटाळले
मुकेश अंबानी धमकी प्रकरण : देवेंद्र फडणवीस यांचे आरोप फेटाळले
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी धमकी प्रकरणात सापडलेल्या स्कॉर्पियो मालक मनसुख हिरेणच्या संशयास्पद मृत्यूमुळे खळबळ उडाली असताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी तपास अधिकारी असलेल्या सचिन वाझेंवर गंभीर आरोप केले आहेत, तर वाझे यांनी फडणवीस यांनी केलेले सर्व आरोप फेटाळून लावत, कार सापडली तेव्हा आपण घटनास्थळी सर्वांत आधी पोहोचलो नसल्याचे स्पष्ट केले.
फडणवीस यांनी स्कॉर्पियो सापडली तेव्हा स्थानिक पोलिसांच्या आधी वाझे घटनास्थळी पोहोचल्याचा आरोप केला होता. यावर, बोलताना वाझे यांनी त्यांच्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत. 'माझ्या आधी तिथे अनेक यंत्रणा गेल्या होत्या. गावदेवी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वाहतूक एसीपी, डीसीपी झोन-२ आणि बीडीडीएसचे पथक आधी पोहोचले होते. त्यानंतर क्राइम ब्रान्चचे युनिट पोहोचले. त्यात मी होतो, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
मनसुख यांच्या मृत्यूबाबतही आताच समजल्याचे सांगत, ठाण्याला जात असल्याचे त्यांनी सांगितले. वाझेंनी हिरेण यांच्यासोबत व्हॉट्सॲप कॉल केल्याचा फडणवीस यांच्या आरोपाबाबत विचारताच, वाझे यांनी त्यांनाच याबाबत विचारा असे सांगत, मला याबाबत काहीच माहिती नसल्याचे सांगत त्यांना आरोप करू द्या, असेही यावेळी स्पष्ट केले.
कोण आहेत सचिन वाझे?
एन्काउंटर स्पेशालिस्ट म्हणून ओळख असलेले सचिन वाझे यांनी आतापर्यंत ६३ एन्काउंटर केले आहे. घाटकोपर बेस्ट बसमध्ये २ डिसेंबर २००२ रोजी झालेल्या बॉम्ब ब्लास्टमधील संशयित ख्वाजा युनूसच्या मृत्यू प्रकरणानंतर सुरू झालेल्या चौकशीच्या ससेमिऱ्याला कंटाळून वाझे यांना निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर १५ वर्षांनी त्यांना पुन्हा सेवेत दाखल करून घेत सशस्त्र पोलीस दलात नेमणूक करण्यात आली. त्यानंतर त्यांच्यावर गुन्हेगारी गुप्तवार्ता विभागाची जबाबदारी सोपवली. या जबाबदारीनंतर त्यांनी टीआरपी घोटाळा, डीसी अवंती कार घोटाळा, फेक फॉलोअर्ससारखे मोठ्या घोटाळ्याला वाचा फोडली होती.
वाझे आणि ठाणे कनेक्शन
मनसुख हिरेन ठाण्यात राहतात. तसेच वाझेही ठाण्यात राहायला आहेत. वाझे यांनी ठाण्यातही काम केले आहे. अशात, स्कॉर्पियो सापडल्यानंतर समोर आलेल्या सीसीटीव्ही फुटेजनुसार, ही स्कॉर्पियो आणि तिच्यासोबत असलेली इनोव्हा कार ठाण्यातून आली आणि पुढे यातील इनोव्हा ठाण्यातच जाते. या ठाणे कनेक्शनमुळे वाझे यांना चौकशीच्या घेऱ्यात उभे करण्यात येत आहे.