Join us

वाझे ‘त्या’ महिलेला दरमहा देत होता 50 हजार रुपये

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2021 8:50 AM

एनआयएचा दावा; २०११पासून होती ओळख

ठळक मुद्देमहिलेने दिलेल्या जबाबानुसार, सचिन वाझेने तिला एका कंपनीची संचालिका केली होती. त्या कंपनीच्या खात्यावर १.२५ कोटी रुपये होते. मात्र, ते कोठून आले, याची माहिती तिला नाही

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : सचिन वाझे एका कॉल गर्लला दरमहा ५० हजार रुपये वेतन म्हणून देत असल्याची बाब अँटालिया स्फोटके आणि मनसुख हिरेन हत्येप्रकरणी एनआयएने दाखल केलेल्या आरोपपत्रात म्हटले आहे. संबंधित महिलाच सचिन वाझेबरोबर एका फाइव्ह स्टार हॉटेलमधील सीसीटीव्हीत कैद झाली. ही महिला कोण, यावरून खळबळ उडाली. अखेर एनआयएने त्याचा उलगडा केला.संबंधित महिलेने २०२० मध्ये कॉल गर्लचे काम सोडले. त्यानंतर तिला सचिन वाझेकडून दरमहा ५० हजार रुपये वेतनस्वरूपात मिळत होते. यंदा फेब्रुवारी महिन्यात सचिन वाझेने तिला ७६ लाख रुपयांच्या नोटा मोजायला लावल्या होत्या. ती सचिन वाझेला २०११ पासून ओळखत असल्याची माहिती त्या महिलेने एनआयए अधिकाऱ्यांना दिली.

महिलेने दिलेल्या जबाबानुसार, सचिन वाझेने तिला एका कंपनीची संचालिका केली होती. त्या कंपनीच्या खात्यावर १.२५ कोटी रुपये होते. मात्र, ते कोठून आले, याची माहिती तिला नाही. या कंपनीच्या व्यवहाराबाबत तिला काहीच माहीत नसून केवळ वाझेच्या सांगण्यावरून ती रिकाम्या चेकवर सही करायची. मुकेश अंबानी यांच्या घराजवळ पार्क केलेली व जिलेटीनने भरलेली एसयूव्ही २५ फेब्रुवारीला जरी सापडली असली तरी वाझेने याचा कट १६ ते २० फेब्रुवारीदरम्यान रचल्याची शक्यता आहे, असे एनआयएने आरोपपत्रात म्हटले आहे. कारण हे पाच दिवस वाझे आपली खरी ओळख लपवून फाइव्ह स्टार ऑबेरॉय हॉटेलमध्ये राहत होता. या हॉटेलमधील एक रूम वाझेने १०० दिवसांसाठी बुक केली होती, असेही एनआयएने म्हटले आहे.

स्फोटके ठेवण्यापूर्वी वाझे अनिल देशमुखांना भेटलाn‘अँटालिया’बाहेर स्फोटके ठेवण्यापूर्वी सचिन वाझेचा दिनक्रम काय होता, याचा उल्लेखही एनआयएने आरोपत्रात केला आहे. जिलेटीनने भरलेली कार अंबानींच्या घराबाहेर ठेवण्यापूर्वी तो कोणाला, कुठे भेटला याची नोंद एनआयएने ठेवली आहे. एका पोलिसाने एनआयएला दिलेल्या जबाबात म्हटले आहे की, २४ फेब्रुवारीच्या संध्याकाळी सचिन वाझे अनिल देशमुख यांना भेटला.n२४ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी वाझे याने एका सीआययूच्या कर्मचाऱ्याला त्याच्याबरोबर यायला सांगितले. वाझे त्याच्या पांढऱ्या रंगाच्या टोयोटामध्ये बसला आणि त्याच्या कारच्या पाठीमागे कर्मचाऱ्यांची कार होती. साडेसातच्या सुमारास वाझे आणि अन्य सर्वजण ज्ञानेश्वरी बंगल्यावर पोहोचले. तेव्हा तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख त्या बंगल्यावर राहत होते, असे त्या पोलिसाने एनआयएला सांगितले. अँटालियाजवळ जिलेटीनने भरलेली गाडी ठेवण्यापूर्वी काही तास आधी देशमुख आणि वाझे यांची बैठक झाली आणि या बैठकीला कोणताही वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित नव्हता, असे एनआयएने आरोपपत्रात म्हटले आहे.

टॅग्स :सचिन वाझेगुन्हेगारीपोलिस