लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर ठेवण्यात आलेल्या अनेक आरोपांच्या चौकशीचा भाग म्हणून विशेष एनआयए न्यायालयाने निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे याची तळोजा कारागृहात चौकशी करण्याची परवानगी सीबीआयला शुक्रवारी दिली.
प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ स्फोटके भरलेली कार ठेवल्याप्रकरणी व ठाण्याचा व्यावसायिक मनसुख हिरेन याच्या हत्येप्रकरणी एनआयएने सचिन वाझे याला अटक केली आहे. गुरुवारी सीबीआयने वाझे याची तळोजा कारागृहात चौकशी करण्याची परवानगी मिळावी, यासाठी विशेष न्यायालयात अर्ज केला होता. कारण सध्या वाझे न्यायालयीन कोठडीत आहे. देशमुख यांच्याविरोधात सुरू असलेल्या तपासासंबंधी वाझे याचा जबाब सीबीआयला हवा आहे. देशमुख यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा नोंदविण्यात आला आहे. त्या दृष्टिकोनातून सीबीआयला वाझे याचा जबाब नोंदवायचा आहे.