Join us  

वाझे यांच्या सहकाऱ्यांवरही अटकेची टांगती तलवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 4:06 AM

‘एनआयए’कडून चारजणांची ८ तास चौकशी सुरू : सचिन वाझे यांना २५ मार्चपर्यंत एनआयए कोठडीलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : ...

‘एनआयए’कडून चारजणांची ८ तास चौकशी सुरू : सचिन वाझे यांना २५ मार्चपर्यंत एनआयए कोठडी

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना २५ मार्चपर्यंत एनआयए कोठडी सुनावण्यात आली आहे. त्याचवेळी मुंबई गुन्हे अन्वेषण शाखेचा गुन्हे गुप्त वार्ता (सीआययू) विभाग राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) रडारवर आला आहे. सचिन वाझे यांच्या नेतृत्वाखाली काम करीत असलेले दोन अधिकारी व दोघा वाहनचालकांची आठ तासांपासून कसून चौकशी करण्यात येत आहे. उशिरापर्यंत ही चाैकशी सुरू असल्याने त्यांनाही अटक केली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

रविवारी दुपारी बारा वाजल्यापासून ‘सीआययू’चे सहायक निरीक्षक रियाजुद्दीन काझी, एक उपनिरीक्षक व दोन वाहनचालकांकडे चौकशी करण्यात येत आहे. वाझे यांच्या सांगण्यानुसार त्यांनी गुन्ह्याच्या कामात त्यांना सहकार्य केल्याचा अधिकाऱ्यांचा कयास आहे. त्यांच्यासह एका सहायक आयुक्त व अन्य काही पोलिसांनाही लवकरच चौकशीसाठी पाचारण केले जाणार असल्याचे समजते. त्यामध्ये विक्रोळी पोलीस ठाण्यातील पोलीसदेखील चौकशीच्या फेऱ्यात अडकण्याची शक्यता आहे. १८ फेब्रुवारीला त्यांनी कोणत्या कागदपत्रांच्या आधारे आणि कोणत्या पोलीस अधिकाऱ्याच्या इशाऱ्यावरून स्कॉर्पिओ चोरीचा गुन्हा दाखल केला, याची चौकशी केली जाणार आहे.

रियाझ काझी हे गेल्या ३ वर्षांपासून सीआययूमध्ये कार्यरत आहेत. सीआययू विभागात सचिन वाझे हे कार्यरत आहेत. जानेवारी महिन्यात टीआरपी घोटाळ्याप्रकरणी केलेल्या कामगिरीबद्दल बेस्ट डिटेक्शन म्हणून मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी सहायक पोलीस आयुक्त शशिकांत सांडभोर, सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे, नितीन लोंढे, संतोष कोटवान आणि रियाझ काझी यांना प्रशस्तिपत्र देऊन सन्मानित केले होते.

कटाचा छडा लावण्याचे आव्हान

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ कारमध्ये आढळलेल्या स्फोटकांप्रकरणी अटक केलेल्या सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना २५ मार्चपर्यंत एनआयए कोठडी सुनावण्यात आली आहे. रविवारी दुपारी विशेष न्यायालयात वाझे यांना हजर केले असता कोर्टाने त्यांना ११ दिवस एनआयए कोठडी सुनावली. या कालावधीत पूर्ण कटाचा छडा आणि आवश्यक पुरावे जमविण्याचे आवाहन तपास अधिकाऱ्यांसमोर आहे.

२४ फेब्रुवारीला पेडर रोड येथे जिलेटिनच्या कांड्या गाडीत ठेवण्यापासून ते त्याचा तपास करीत असल्याचा बनाव करेपर्यंत आणि स्कॉर्पिओचे मालक मनसुख हिरेन यांच्या मृत्यूपर्यंतच्या घटनेत वाझे यांचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाले आहे. वाझे यांनी या कृत्याची कबुली दिल्याचा दावा यावेळी सरकारी वकिलांकडून करण्यात आला, तर बचाव पक्षाच्या वकिलांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

या प्रकरणाच्या चौकशीसाठी राष्ट्रीय तपास यंत्रणेने वाझे यांना शनिवारी सकाळी ११ वाजता पेडर रोड येथील कार्यालयात बोलावले होते. सुमारे १३ तास चौकशी केल्यानंतर रात्री ११.५० वाजता त्यांना अटक करण्यात आली. सकाळी त्यांची जे. जे. रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर दुपारी अडीचच्या सुमारास त्यांना सत्र न्यायालयातील एनआयएच्या विशेष न्यायालयात हजर करण्यात आले.

निलंबन अटळ

कोणत्याही शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्याला ४८ तासांहून अधिक काळ पोलीस कोठडी मिळाल्यास त्याचे निलंबन केले जाते. त्यामुळे सचिन वाझे यांच्यावरील निलंबनाची कारवाई अटळ असून येत्या दोन दिवसांत आयुक्तांकडून त्याबाबतचे आदेश जारी केले जातील, असे सूत्रांकडून सांगण्यात आले.

‘ती’ इनोव्हा क्राईम ब्रँचचीच

अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ जिलेटिनच्या कांड्या असलेल्या स्कॉर्पिओच्या पाठीमागे पांढऱ्या रंगाची इनोव्हा सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत होती. ही गाडी क्राईम ब्रँचच्याच वाझे कार्यरत असलेल्या गुन्हे गुप्त वार्ता (सीआययू)ची असल्याचे स्पष्ट झाले आहे. एनआयएच्या अधिकाऱ्यांनी रविवारी ती गाडी जप्त केली.

सचिन वाझेंवरील दाखल कलमे

एनआयएने सचिन वाझे यांच्यावर भारतीय दंड विधान कलम २८६, ४६५, ४७३, ५०६ (२), १२० ब आणि स्फोटक पदार्थ कायदा १९०८ कलम ४ अ, ब अंतर्गत कारवाई केली आहे.

कलम २८६- जाणीवपूर्वक किंवा अजाणतेपणाने स्फोटके बाळगणे, इतरांच्या जिवाला धोका होईल असे वर्तन करणे

कलम ४६५ - खोट्या किंवा बनावट गोष्टी करणे

कलम ४७३ – दिशाभूल करण्यासाठी केल्या जाणाऱ्या बनावट कृती

कलम ५०६(२) - दहशत निर्माण करणे किंवा धमकी देणे

कलम १२० ब – गुन्हेगारी स्वरूपाच्या षड्‌यंत्रात सहभाग घेणे

स्फोटक पदार्थ कायदा १९०८ कलम ४ अ, ब – स्फोटके बाळगण्याचा यात समावेश आहे.