‘एनआयए’कडून वाझेची सीएसएमटी-ठाणे लोकलवारी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 04:06 AM2021-04-07T04:06:35+5:302021-04-07T04:06:35+5:30
* त्या रात्री घडलेला प्रसंग पुन्हा नाट्यात्मक पद्धतीने केला उभा लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राष्ट्रीय तपास यंत्रणा ...
* त्या रात्री घडलेला प्रसंग पुन्हा नाट्यात्मक पद्धतीने केला उभा
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा पूर्ण छडा लावण्यात आता जवळपास यशस्वी झाली आहे. त्यांची हत्या झालेल्या ४ मार्चच्या रात्रीच्या सर्व घटनाक्रमाचा त्यांनी उलगडा केला आहे. त्यासाठी सोमवारी (दि. ५) मध्यरात्री मुख्य आरोपी असलेला निलंबित पाेलीस अधिकारी सचिन वाझेची सीएसएमटी ते कळवा लोकलवारी घडविली. सीआययूच्या कार्यालयापासून हत्या करून परत मुंबईत येईपर्यंतच्या त्याच्या गुन्ह्याच्या कृत्याचे नाट्यरूपांतर (क्राईम सीन रिक्रिएट) करण्यात आला. रात्री सव्वाअकरा ते दोन वाजेपर्यंत त्याची कारवाई सुरू होती. तपास पथकासमवेत पुण्यातील ‘सीएफएसएल’चे तंत्रज्ञांचे पथकही सोबत होते.
ठाण्यातील व्यावसायिक मनसुख हिरेन यांची ४ मार्चला हत्या करण्यात आली होती. त्यासाठी वाझे हा आपला कार्यालयीन वापरातील मोबाईल सीआययू कार्यालयात ठेवून सीएसएमटीपर्यंत चालत गेला. तेथून कळवा येथे ताे लोकलने गेला. हा सर्व घटनाक्रम तपास अधिकाऱ्यांनी पुन्हा त्याच्याकडून सविस्तरपणे करून घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.
* ‘त्या’ दिवशी वाझेने काय केले ?
सीसीटीव्ही फुटेजच्या पडताळणीनुसार, एका फुटेजमध्ये ४ मार्चला सायंकाळी सव्वासातच्या सुमारास वाझे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्सच्या दिशेने चालत जाताना दिसतो. ओळख पटू नये यासाठी त्याने मुद्दाम गर्दीच्या वेळी लोकलमधून जाण्याचे ठरविले. तपास यंत्रणांना भरकटविण्यासाठी आपला मोबाईल सीआययूच्या कार्यालयातच ठेवला होता. ठाणे स्थानकावर आठच्या सुमारास ताे पोहोचला. त्याने आपला सहकारी शिंदे याला तावडे या नावाने हिरेनला फोन करून घोडबंदरला बोलाविण्यास सांगितले. तेथून शिंदे व गोरेसाेबत गाडीतून जाऊन हिरेनचा मृतदेह खाडीत टाकल्यानंतर तो परत मुंबईत गेला. डोंगरीत बारवर छापा टाकण्याचा कारवाईत असल्याचा बनाव केला. एका सहकाऱ्याला कार्यालयातून आपला मोबाईल घेऊन येण्यास सांगितले होते. मात्र सीसीटीव्ही फुटेजमुळे त्याचे बिंग फुटले.
* सीसीटीव्ही फुटेज खराब असल्याने घेतला निर्णय
सीएसएमटी स्थानकावर सचिन वाझेचे सीसीटीव्ही फुटेज सापडले आहे. त्याचा दर्जा अत्यंत खराब आहे. त्यामुळे सोमवारी रात्री त्याला पुन्हा त्याच वेशातून तेथे चालविण्यात आले, जेणेकरून त्याच्या सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी करून पहिल्या फुटेजचे साधर्म्य असल्याचे स्पष्ट केले जाईल, असे सूत्रांनी सांगितले.
------------